साताऱ्यात कंत्राटी कर्मचाऱ्यांकडून घंटानाद आंदोलन, ठेकेदारांकडून पिळवणूक होत असल्याचा केला आरोप
By सचिन काकडे | Published: November 1, 2023 03:59 PM2023-11-01T15:59:09+5:302023-11-01T15:59:28+5:30
सातारा : सातारा पालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांना किमान वेतन आयोगाप्रमाणे वेतन मिळत नाही, वेतनातून भविष्य निर्वाह निधीची रक्कम कपात केली ...
सातारा : सातारा पालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांना किमान वेतन आयोगाप्रमाणे वेतन मिळत नाही, वेतनातून भविष्य निर्वाह निधीची रक्कम कपात केली जाते मात्र त्याचाही तपशील त्यांना दिला जात नाही. या कर्मचाऱ्यांना वेतन वाढ करावी, दिवाळीसाठी सानुग्रह अनुदान द्यावे आदी प्रमुख मागण्यांसाठी बुधवारी सकाळी कंत्राटी कर्मचाऱ्यांकडून पालिकेच्या जुन्या प्रवेशद्वारासमोर घंटानाद आंदोलन करण्यात आले.
कर्मचाऱ्यांनी घंटानाद व घोषणाबाजी केल्यानंतर मुख्याधिकारी अभिजीत बापट यांना मागण्यांचे निवेदन दिले. यावेळी झालेल्या बैठकीत संघटनेने संबंधित ठेकेदारांकडून कंत्राटी कामगारांची पिळवणूक होत असल्याचा आरोप केला. गेली दहा-पंधरा वर्षे काम करूनही या कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन दिले जात नाही. मिळणारे वेतनही खात्यात जमा केले जात नाही. भविष्य निर्वाह निधीची रक्कम कपात केली जाते की नाही याची कर्मचाऱ्यांना कोणतीही माहिती दिली जात नाही. त्यांना सुरक्षेची साधने देखील पुरवली जात नाही. दिवाळीला पाचशे ते हजार रुपयांचा बोनस दिला जातो.
कर्मचाऱ्यांचे हजेरी पुस्तक भरून घेतले जात नाही. काही तक्रार केल्यास उलट कर्मचाऱ्यांनाच दमदाटी करून कामावरून काढून टाकण्याची भाषा ठेकेदारांकडून केली जाते. अशा अनेक तक्रारी संघटनेकडून मुख्याधिकाऱ्यांपुढे मांडण्यात आल्या. या तक्रारींची दखल घेत मुख्याधिकारी बापट यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दालनात बोलावून, योग्य ती कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ) रोजगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष गणेश वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या आंदोलनात महिलांचा सहभाग लक्षणीय होता.
अशा आहेत मागण्या..
- कंत्राटी कर्मचाऱ्यांना महागाई निर्देशांकानुसार ५० टक्के पगार वाढ केली जावी. पगाराएवढाच दिवाळी बोनस मिळावा
- कोणत्याही कंत्राटी कर्मचाऱ्याचा कामावर असताना मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला आर्थिक मदत दिली जावी
- नियमानुसार ओळखपत्र दिले जावे तसेच दैनंदिन हजेरी पुस्तकात नोंद केली जावी
- सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांना सुरक्षेची साधने पुरवावीत
- त्यांचा आरोग्य विमा काढला जावा
- वेतन एकाच दिवशी बँक खात्यामध्ये जमा करावे