झोपडपट्टी सुरक्षा दलाचा वाई पालिकेवर मोर्चा
By admin | Published: June 16, 2015 01:20 AM2015-06-16T01:20:42+5:302015-06-16T01:20:42+5:30
आंदोलक-अधिकाऱ्यांमध्ये तू तू-मैं मंै : सदनिकांचे नियमबाह्य वाटप केल्याचा आरोप
वाई : एकात्मिक गृहनिर्माण व झोपडपट्टी विकास कार्यक्रमांतर्गत गुरेबाजार येथे बांधण्यात आलेल्या सदनिकांपासून मुख्य लाभार्थींना वंचित ठेवून याचे नियमबाह्य वाटप करण्यात आले आहे, असा आरोप करीत ही वाटपप्रक्रिया तत्काळ स्थगित करण्यात यावी, या मागणीसाठी सोमवारी (दि. १५) झोपडपट्टी सुरक्षा दलाच्या वतीने नगर पालिकेवर मोर्चा काढण्यात आला. दरम्यान, पालिका अधिकारी व आंदोलकांमध्ये या विषयावरून शाब्दिक चकमक उडाली. त्यामुळे काहीकाळ तणाव निर्माण झाला होता.
याबाबत महाराष्ट्र राज्य झोपडपट्टी सुरक्षा दलाचे अध्यक्ष भगवानराव वैराट यांनी नगराध्यक्षांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, एकात्मिक गृहनिर्माण व झोपडपट्टी विकास कार्यक्रमांतर्गत गुरेबाजार, सिद्धनाथवाडी झोपडपट्टीधारकांसाठी ३४२ सदनिका बनविण्याच्या योजनेला केंद्र शासनाने म्हाडा अंतर्गत मंजुरी दिली आहे. त्यापैकी ९६ सदनिकांचे काम पूर्ण झाले आहे. मात्र, मुख्य लाभधारकांना यापासून वंचित ठेवून काही नागरिकांना सदनिकांचे नियमबाह्य वाटप करण्यात आले आहे.
या प्रकल्पासाठी ११७ लाभार्थींच्या झोपड्या हटविण्यात आल्या; पंरतु बांधण्यात आलेल्या सदनिकेत त्यांना घरे देण्यात आली नाही.
स्थानिक नगरसेवक व नगराध्यक्षांच्या मर्जीतील लोकांना सदनिकेचे वाटप करण्यात आल्याचा आरोप निवदेनात करण्यात आला आहे. त्यामुळे वाटपप्रक्रिया स्थगित करून खऱ्या लाभधारकांना सदनिकेचे वाटप करण्यात यावे, अशी मागणी निवदेनात केली आहे. मोर्चात सुरक्षा दलाचे कार्यकर्ते व महिला
मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. (प्रतिनिधी)
शाब्दिक बाचाबाची
सदनिकांचे नियमबाह्य वाटप झाल्याचा आरोप करीत भगवानराव वैराट व आंदोलनकांनी मुख्याधिकारी आशा राऊत व नगराध्यक्ष भूषण गायकवाड यांना घेराव घालून जाब विचारण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, माजी नगराध्यक्ष राजाभाऊ खरात व नगरसेवक दत्तात्रय (बुवा) खरात यांनी पालिकेत येऊन भगवानराव वैराट यांच्यापुढे अनेक प्रश्नांची सरबत्ती केल्याने आंदोलक व अधिकाऱ्यांमध्ये शाब्दिक चकमक उडाली़ पोलिसांनी हस्तक्षेप करून वातावरण शांत केले.