आई-वडिलांसमोरच चिमुरड्याला स्कूल बसने चिरडले
By admin | Published: September 5, 2015 11:21 PM2015-09-05T23:21:34+5:302015-09-05T23:26:00+5:30
गोटेतील दुर्घटना : भावाला ‘बाय-बाय’ करताना काळाचा घाला
कऱ्हाड : आपल्या भावाला स्कूलबसपर्यंत सोडण्यासाठी आलेल्या दोन वर्षांच्या चिमुरड्याला आई, वडील व भावादेखत त्याच बसने चिरडले. ही दुर्घटना कऱ्हाडनजीक गोटे येथे शनिवारी सकाळी सव्वाआठच्या सुमारास घडली. रहिमान मोहसीन मुल्ला असे मृत बालकाचे नाव आहे. रहिमानचा डोळ्यादेखत मृत्यू झाल्याने त्याच्या कुटूंबियांनी आक्रोश केला.
पोलीस व घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, गोटे येथील दत्त कॉलनीत मोहसीन मुल्ला हे कुटूंबासह वास्तव्यास आहेत. मोहसीन हे टेम्पोचालक असून त्यांचा मोठा मुलगा शहरातील कल्याणी इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शिकतो. त्याला शाळेत नेण्यासाठी व शाळेतून परत घरी सोडण्यासाठी दररोज एक स्कूलबसमुल्ला यांच्या घरासमोर येते. संबंधित बस शनिवारी सकाळीही मुल्ला यांच्या घरासमोर आली. सर्व आटोपून रहिमानचा मोठा भाऊ शाळेत जाण्यासाठी घराबाहेर पडला. वडील मोहसीन हेसुद्धा त्याच्यासोबत घराबाहेर आले. याचवेळी रहिमान हा वडील व भावाच्या पाठीमागे चालत येऊन व्हॅनशेजारी थांबला. चालकाच्या शेजारीच व्हॅनलगत तो उभा होता. मात्र, हे चालकाच्या लक्षात आले नाही. मुलगा बसल्यानंतर चालकाने अचानक गाडी सुरू करून वेग वाढविला. त्यामुळे गाडीचा धक्का लागून रहिमान गाडीच्या चाकाखाली पडला. व्हॅन त्याच्या अंगावरून पुढे गेली. त्यामुळे त्यांच्या डोक्यासह पोटाला गंभीर दुखापत झाली. आई, वडीलांसमोरच रहिमान रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. या दुर्घटनेमुळे मुल्ला कुटुंबियांनी आक्रोश सुरू केला. नातेवाईकांसह परिसरातील ग्रामस्थांनी रहिमानला उपचारार्थ तातडीने स'ाद्री रूग्णालयात आणले. मात्र, रूग्णालयात पोहोचण्यापुर्वीच त्याचा मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक अनिल भोसले, हवालदार राजे, देव तातडीने घटनास्थळी पोहोचले. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून चालकाला ताब्यात घेतले. अपघाताची नोंद शहर पोलिसात झाली आहे. (प्रतिनिधी)