कडाक्याची थंडी अन् स्ट्रॉबेरीची गोडी, महाबळेश्वर, पाचगणीच्या बाजारपेठेत फळे विक्रीसाठी दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2017 03:12 PM2017-12-19T15:12:12+5:302017-12-19T15:15:27+5:30
पर्यटनस्थळाबरोबरच स्ट्रॉबेरी लॅण्ड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वर व पाचगणीत स्ट्रॉबेरी फळाचा हंगाम सुरू झाला आहे. या ठिकाणी भेट देणाऱ्या पर्यटकांनाही आता कडाक्याची थंडी अन् स्ट्रॉबेरीची गोडी चाखायला मिळू लागली आहे. स्ट्रॉबेरी हे महाबळेश्वरचे मुख्य पिक असून थंडीत येणारे एकमेव फळ आहे.
सातारा : पर्यटनस्थळाबरोबरच स्ट्रॉबेरी लॅण्ड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वर व पाचगणीत स्ट्रॉबेरी फळाचा हंगाम सुरू झाला आहे. या ठिकाणी भेट देणाऱ्या पर्यटकांनाही आता कडाक्याची थंडी अन् स्ट्रॉबेरीची गोडी चाखायला मिळू लागली आहे.
स्ट्रॉबेरी हे महाबळेश्वरचे मुख्य पिक असून थंडीत येणारे एकमेव फळ आहे. देशाच्या एकूण उत्पादनापैकी ८७ टक्के उत्पादन एकट्या महाबळेश्वर तालुक्यातून घेतले जाते. पावसाळा संपताच तालुक्यात स्ट्रॉबेरीची लागवड केली जाते.
याठिकाणी प्रामुख्याने स्वीटचार्ली, कामारोजा, विंटर डाऊन या जातीच्या रोपांची लागवड मोठ्या प्रमाणात होते. स्वीटचार्ली हे फळ आकाराने मोठे, रसाळ व गोड असल्याने पर्यटकांमधून स्वीट चार्लीला सर्वाधिक मागणी होत असते.
सध्या स्ट्रॉबेरी पिकाला पोषक वातावरण निर्माण झाले असून फळे विक्रीसाठी बाजारपेठेत दाखल झाली आहे. उत्पादन कमी असल्याने सध्या २५० रुपये किलो या दराने स्ट्रॉबेरीची विक्री केली जात आहे. येथील अल्हाददायक वातावरणाची मजा लुटण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना आता स्ट्रॉबेरीची गोडी चाखायला मिळत आहे.