मलकापुरात मंडईसह फळबाजार रस्त्यावरच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 04:41 AM2021-02-11T04:41:24+5:302021-02-11T04:41:24+5:30
मलकापूर : शहरात दररोज रस्त्यावरच भाजी मंडईसह फळबाजार भरत आहे. वाहनांच्या वर्दळीने उडालेली धूळ मोठ्या प्रमाणात भाजीपाला व फळांवर ...
मलकापूर : शहरात दररोज रस्त्यावरच भाजी मंडईसह फळबाजार भरत आहे. वाहनांच्या वर्दळीने उडालेली धूळ मोठ्या प्रमाणात भाजीपाला व फळांवर बसते. या धुळीमुळे विक्रेत्यांसह ग्रहकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर येत आहे. रस्त्याच्या कडेला व फुटपाथवर भाजीविक्रेते, तर ग्राहकांची वाहने रस्त्यावरच उभी होत असल्याने अपघातालाही आमंत्रण मिळत आहे.
मलकापुरात आठवडी बाजार नसला तरी दररोज शहरामधील रस्त्यावरच भाजी मंडईसह फळबाजार भरत असतो. भाजी मंडईवरून गेल्या अनेक वर्षांपासून आरोप-प्रत्यारोप सुरू होते. मंडईत बसण्यावरून वारंवार वादही झाले आहेत. खासगी जागेत बसणारी मंडई नियोजनबद्ध जागेत बसवण्याचे पालिकेचे प्रयत्न सुरू आहेत. जखीणवाडी-कोयना वसाहत रस्ता रुंदीला कमी असून, सध्या त्या ठिकाणी रस्त्यावर भाजी मंडई भरत आहे. त्यामुळे सकाळी व सायंकाळी या रस्त्यावरून वाट काढताना पादचारी, वाहनधारक मेटाकुटीला येतात.
आगाशिवनगरला कऱ्हाड-ढेबेवाडी मार्गाच्या कडेलाच विक्रेते दररोजच बाजार मांडतात. शिवछावा चौक ते झेडपी कॉलनी परिसरात झालेल्या गर्दीमुळे आपघातही घडले आहेत, तर मलकापूर फाटा ते अक्षता मंगल कार्यालय परिसरात फळ विक्रेत्यांनी ठाण मांडलेले असते. मलकापुरात दररोज रस्त्यावर ही परिस्थिती असते. वाहनांच्या वर्दळीने उडालेली धूळ या भाजीपाला तसेच फळांबर असते. आणि तोच भाजीपाला व फळे ग्राहकांकडून खरेदी केली जातात. त्यामुळे त्यांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण होत आहे.
- चौकट (फोटो : १०केआरडी०६)
सुसज्ज मंडई विक्रेत्यांच्या प्रतीक्षेत
धनगर समाजबांधवांच्या १६ गुंठे जागेत भाजी मंडईचे काम पूर्ण झाले आहे. मंडईचे अहिल्यादेवी होळकर भाजी मंडई असे नामकरणही करण्यात आले. मंडईत विक्रेत्यांना बसण्यासाठी कट्टे बांधण्यात आले आहेत. एकावेळी दीडशे विक्रेते बसतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे. वर्षानुवर्ष केवळ चर्चेत अडकलेल्या या भाजी मंडईचा प्रारंभ काही दिवसांपूर्वी झाला. मात्र, अद्यापही तेथे मंडई सुरू झालेली नाही.
- चौकट
उपाययोजनांची गरज
१) अहिल्यादेवी होळकर भाजी मंडई सुरू करावी.
२) फळ विक्रेत्यांसाठी स्वतंत्र व्यवस्था होण्याची गरज.
३) मलकापूरप्रमाणे आगाशिवनगरलाही भाजी मंडई सुरू होणे गरजेचे.
४) खरेदीदारांनी वाहने सुरक्षितस्थळी पार्क करूनच खरेदी करावी.
५) शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र व्यवस्था असणे गरजेचे.
फोटो : १०केआरडी०५
कॅप्शन : मलकापुरात रस्त्यावरच भाजी मंडई भरत असल्याने आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण होत आहे.