Satara News: भीषण आगीत फळे विक्रेत्याचे दुकान जळून खाक, मोठे नुकसान
By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2023 04:26 PM2023-03-15T16:26:55+5:302023-03-15T16:28:15+5:30
आगीचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट
माणिक डोंगरे
मलकापूर : अचानक लागलेल्या भीषण आगीत फळे विक्रेत्याचे दुकान जळून खाक झाले. पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गालगत सह्याद्री हॉस्पिटलजवळ आज, बुधवारी सकाळच्या सुमारास ही घटना घडली. आगीमध्ये दुकानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, आगीचे नेमके कारण समजू शकले नाही.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, वारुंजी फाटा येथून पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग ते जुन्या ब्रिटिशकालीन पुलावरून कऱ्हाडमध्ये येणारा रस्ता आहे. या मार्गावर फळे विक्री करणाऱ्या व्यावसायिकांची दुकाने आहेत. आज, सकाळच्या सुमारास येथील एका फळाच्या दुकानास अचानक आग लागली. दुकानास आग लागल्यामुळे परिसरात धुरांचे मोठ्या प्रमाणात लोट पसरले. यावेळी परिसरातील इतर फळ विक्रेत्यांमध्ये एकच गोंधळ उडाला.
विक्रेत्यांसह नागरिकांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र, आग आटोक्यात येत नसल्याचे निदर्शनास आले. काही वेळातच आगीने रौद्ररूप धारण केले. दरम्यान, काही नागरिकांनी या घटनेची माहिती पोलिस व कऱ्हाड नगरपालिकेच्या अग्निशामक दलाच्या पथकास दिली. यानंतर कऱ्हाड पालिका अग्निशामक दलाचे बंब व कर्मचारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. अर्ध्या तासाच्या प्रयत्नानंतर आग विझविण्यात यश आले.
मात्र, तोपर्यंत फळविक्रेत्याच्या दुकानासह माल व साहित्य जळून खाक झाले. या आगीत हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे. ही आग नेमकी कशामुळे लागली? त्याचे कारण अद्याप समजू शकले नाही. अधिक तपास पोलिसांकडून केला जात आहे.