फळविक्रेत्यांचा फंडा; खोटं बोलून गंडा!, साताऱ्यात ग्राहकांमधून संताप

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2025 17:57 IST2025-02-17T17:56:18+5:302025-02-17T17:57:04+5:30

सातारा : फळविक्रेत्यांमध्ये अलीकडे मोठी स्पर्धा सुरू झाली असून, आपला व्यवसाय तेजीत चालावा, यासाठी काहीजण नव्या क्लृत्प्या शोधून काढत ...

fruit sellers are angry with customers for attracting customers by telling lies In Satara | फळविक्रेत्यांचा फंडा; खोटं बोलून गंडा!, साताऱ्यात ग्राहकांमधून संताप

संग्रहित छाया

सातारा : फळविक्रेत्यांमध्ये अलीकडे मोठी स्पर्धा सुरू झाली असून, आपला व्यवसाय तेजीत चालावा, यासाठी काहीजण नव्या क्लृत्प्या शोधून काढत असतात. असाच फंडा साताऱ्यातील काही फळविक्रेत्यांनी शोधून काढला आहे; मात्र खोटं बोलून गंडा घालण्याचा हा प्रकार असल्याचे समजताच नागरिकांमधून संतापही व्यक्त होत आहे.

साताऱ्यातील राजवाडा परिसरातील काही फळविक्रेत्यांनी ‘दोन पैसे कमी मिळूदेत; पण व्यवसाय इमानदाराने करायचा’ असे सूत्र अंगीकारले आहे. हे फळविक्रेते गेल्या अनेक वर्षांपासून येथे व्यवसाय करत आहेत; मात्र या व्यवसायातही आता स्पर्धा वाढली आहे. येथील हातगाड्यांची संख्या पूर्वी जेमतेमच होती. आता मात्र आठ-दहा नव्या गाड्या येथे सुरू झाल्या आहेत.

ग्राहकांना आकर्षिक करण्यासाठी येथील काही फळविक्रेते शंभर, दीडशे रुपये किलोने मिळणारी फळे ४० रुपये किलो अशी आरोळी देतात. दर कमी असल्याने ग्राहकही त्यांच्याकडे आकर्षित होतात; मात्र प्रत्यक्षात त्या गाड्यावर ४० रुपये किलो या दराने एकही फळ मिळत नाही, हे जेव्हा ग्राहकांना सांगितले जाते, तेव्हा ते संताप व्यक्त करतात. मग ४० रुपये किलो आवाज का दिला? असा प्रतिप्रश्न केल्यानंतर त्या विक्रेत्याकडून ‘आमच्या धंद्यात स्पर्धा वाढलीय. जर असा आवाज दिला नाही तर आमच्याकडे ग्राहक कधी येणार, आमचा गाडा कसा चालणार’ असे उत्तर दिले जात आहे.

विरोध नाही; पण खोटी आरोळी नको

उदरनिर्वाहाची गाडी चालविण्यासाठी जो-तो कष्ट करत असतो. शहरातील फळविक्रेतेही दिवसभर राबत असतात. त्यांच्या व्यवसायाला कोणाचाही विरोध नाही; परंतु त्यांनी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अशा खोट्या आरोळ्या देऊ नये, अशी अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

Web Title: fruit sellers are angry with customers for attracting customers by telling lies In Satara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.