सातारा शहरात बहरणार फळे, फुले अन् वनौषधी वृक्ष!
By सचिन काकडे | Published: June 19, 2024 07:55 PM2024-06-19T19:55:03+5:302024-06-19T19:55:24+5:30
पालिकेचे २० हजार ५०० वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट
सचिन काकडे/सातारा :सातारा पालिकेने शहर सुशोभीकरणावर भर दिला असताना आता पर्यावरण संवर्धनासाठीही एक पाऊल पुढे टाकले आहे. शहरासह पेढ्याचा भैरोबा डोंगरावर पालिकेच्या माध्यमातून तब्बल २० हजार ५०० फळे, फुले व वनौषधींची लागवड केली जाणार असून, मान्सून सुरू झाल्याने वृक्षलागवडीने गती घेतली आहे.
सातारा पालिकेने या कामाची जबाबदारी सोनाली कंस्ट्रक्शन या संस्थेवर सोपविली असून, या संस्थेकडून पेढ्याचा भैरोबा डोंगरावर पहिल्या टप्प्यात ६ हजार ३०० खड्डे खोदण्यात आले आहेत. येथील मंदिराकडे जाणाऱ्या पायरी मार्गाच्या दुतर्फा, बंधाऱ्यालगत तसेच मंदिर परिसरात विविध जातीची फुलझाडे, फळझाडे व औषधी वृक्ष लावण्याचे काम सुरू आहे. वृक्षलागवडीकरिता राजमंडरी (आंध्र प्रदेश) येथून दहा फुटांचे वृक्ष आणण्यात आले आहेत. पहिल्या टप्प्यात दहा हजार वृक्ष उपलब्ध झाले असून, पायरी मार्गालगत वृक्षलागड सुरू करण्यात आली आहे.
अशी होणार वृक्षलागवड...
भैरोबा डोंगर पायरी मार्गाच्या दुतर्फा : बहावाचे १७५ वृक्ष
मंदिरालगत : आपटा, सोनचाफा, कांचन, बकुळ, कदंब, पिवळा चाफा असे एकूण २ हजार २८० वृक्ष
बंधाऱ्यालगत : गोरखचिंच, आवळा, आंबा, जांभूळ, बोर, उंबर, चिंच, बिब्बा आदींचे २ हजार ३१० वृक्ष
डोंगर भाग : कडुलिंब, उंबर, अर्जुन, पिंपळ, ताम्हण, कुसुम आदी जातींचे एकूण १० हजार ५०० वृक्ष
एकूण ५८ हजार स्केअर मीटर क्षेत्रात १५ हजार २६५ वृक्षांची लागवड केली जाणार आहे.