गॅससह इंधन दरवाढीचा मिठाई व्यावसायिकांना झटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:49 AM2021-09-16T04:49:03+5:302021-09-16T04:49:03+5:30

सातारा : विघ्नहर्ता गणरायाच्या स्वागतापूर्वीच बाजारपेठेवर दरवाढीचे विघ्न आल्याने मिठाईच्या दरात वाढ झाली आहे. सार्वजनिक उत्सवावर आलेल्या मर्यादेने नवस ...

Fuel price hike with gas hits confectionery traders | गॅससह इंधन दरवाढीचा मिठाई व्यावसायिकांना झटका

गॅससह इंधन दरवाढीचा मिठाई व्यावसायिकांना झटका

Next

सातारा : विघ्नहर्ता गणरायाच्या स्वागतापूर्वीच बाजारपेठेवर दरवाढीचे विघ्न आल्याने मिठाईच्या दरात वाढ झाली आहे. सार्वजनिक उत्सवावर आलेल्या मर्यादेने नवस फेडणाऱ्यांची संख्याही कमी झाल्याने मिठाई व्यावसायिक ग्राहक टिकविण्यासाठी प्रयत्नशील आहेत.

सणासुदीच्या दिवसांत मिठाईची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मागणी वाढली की, दरही वाढतात, असा पायंडा असला, तरी यावर्षी गणेशोत्सवात मिठाईचे दर स्थिरच आहेत. तथापि, मिठाईसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाचे दर वाढल्याने आगामी काही दिवसांत मिठाईचे दर वाढण्याची शक्यता व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे. कच्च्या मालाचे दर वाढल्यास मिठाईचा दर वाढतो. मात्र, यावेळी कच्च्या मालाचे दरच उत्सव कालावधीत जैसे थे राहिले आहेत, तसेच भट्टीसाठी लागणाऱ्या इंधनाच्या किमतीत वाढ झाली असली तरी मिठाईचेही दर स्थिर ठेवण्यात आले आहेत.

चौकट :

का वाढले दर?

पेट्रोल, डिझेलच्या दरांत झालेली वाढ, कामगारांचे वाढलेले पगार यांचा विचार करता किरकोळ दरवाढ झाली आहे. सध्या ग्राहक टिकवणं हा उद्देश आहे. त्यामुळं कोणीही अनावश्यक धाडस करून स्वत:ला अडचणीत आणणार नाही, हे नक्की.

-प्रशांत मोदी, स्वीट मार्ट चालक

मागील काही दिवसांत दुधाचे भाव चांगलेच वाढले आहेत. मिठाई बनवताना सर्वांत जास्त दूध आणि साखरेचा वापर होतो. दूध आणि साखर यांच्यासह गॅस सिलिंडरचाही दर वाढल्याने उत्पादनाचा खर्च वाढला आहे. परिणामी, किलोमागे मिठाईचे दरही वाढले आहेत.

-आनंद काळे, स्वीट मार्ट चालक

भेसळीकडे असू द्या लक्ष

धार्मिक उत्सवात लोकांचा मिठाई खरेदीकडे जास्त कल असतो. काही विक्रेते भेसळयुक्त खाद्यपदार्थांची विक्री करतात. सणासुदीच्या काळात मागणी वाढली की, अधिक पुरवठा करता यावा, तसेच त्यात अधिक नफा मिळावा, यासाठी मिठाईत भेसळ करण्याचा प्रयत्न होतो. खाद्यपदार्थ आकर्षक दिसण्यासाठी वापरण्यात येणारा रंग, मिठाईचे आयुष्य वाढविण्यासाठी पदार्थात टाकलेले हानिकारक घटक यामुळेही भेसळ होते.

ग्राहक म्हणतात...

मिठाईची चव आणि दर्जा बघून पैसे द्यायला हरकत नाही. यंदा मिठाई घेण्यासाठी दुकानांवर ग्राहकांची झुंबड आहे. त्याचा गैरफायदा घेऊन दर वाढविणे चुकीचे आहे. हा ग्राहकांच्या हक्कांवर घातलेला घाला आहे.

-नेहा शिवदे, सातारा

गणेशोत्सव असो की, अन्य कोणताही उत्सव या काळात घराघरांत मिठाई लागतेच. सध्या दैनंदिन विविध वस्तूंचे दर सातत्याने वाढत आहेत. मात्र, सण असल्याने दर वाढले तरी आर्थिक भुर्दंड सोसून खरेदी करावीच लागते.

-सुधीर सायगावे, सातारा

दरांवर नियंत्रण कोणाचे?

मिठाईच्या दर्जावर अन्न व औषध प्रशासन नियंत्रण ठेवते; पण दरावर मात्र कोणाचेच नियंत्रण नाही. नाही म्हणायला बेकरी व स्वीट मार्ट असोसिएशनने मात्र स्वत:हून नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. पेढे, बर्फी यांचे दर प्रत्येक दुकानात वेगवेगळ्या पद्धतीने लावले जात आहेत. हे दर आकारताना आपण त्यात दर्जेदार, शुद्ध तुपाचा वापर केल्याचे सांगतात. प्रत्यक्षात यात काहीच नसते; पण मोठ्या दुकानांच्या दरानेच छोटे विक्रेते आपला माल विकतात.

...................

Web Title: Fuel price hike with gas hits confectionery traders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.