खुनी हल्ल्यातील फरार आरोपीला वर्षानंतर अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 04:36 AM2021-01-18T04:36:08+5:302021-01-18T04:36:08+5:30
भरत आत्माराम पाटील (वय ४७, रा. दिवशी बुद्रुक, ता. पाटण) असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिवशी बुद्रुक ...
भरत आत्माराम पाटील (वय ४७, रा. दिवशी बुद्रुक, ता. पाटण) असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिवशी बुद्रुक येथील भरत पाटील याचा गावातीलच पांडुरंग विठ्ठल सूर्यवंशी व सदाशिव महादेव सूर्यवंशी यांच्याशी जमिनीवरून वाद आहे. याच कारणावरून १२ जानेवारी २०२० रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास भरत पाटील याने त्याच्या तीन साथीदारांसोबत पांडुरंग सूर्यवंशी व सदाशिव सूर्यवंशी यांची दुचाकी अडवून शिवीगाळ, दमदाटी करीत ठार मारण्याच्या उद्देशाने त्यांच्यावर हल्ला केला. भरत पाटील याने लाकडी दांडक्याने मारहाण करून स्वत:जवळील रिव्हॉल्व्हर काढून ती पांडुरंग सूर्यवंशी यांच्या डोक्याला लावली. त्याद्वारे ठार मारण्याचा प्रयत्न करीत असताना सदाशिव सूर्यवंशी यांनी झटापट करून भरत पाटीलच्या हातातील रिव्हॉल्व्हर हिसकावून घेतली. मात्र, त्यानंतर जितेंद्र सूर्यवंशी याने सदाशिव यांच्याकडून पुन्हा रिव्हॉल्व्हर हिसकावून घेऊन आरोपींनी तेथून पोबारा केला. याबाबत पांडुरंग सूर्यवंशी यांनी पाटण पोलिसांत फिर्याद दिली होती. त्यानुसार भरत पाटील याच्यासह त्याच्या साथीदारांवर गुन्हा दाखल झाला होता. तेव्हापासून भरत पाटील हा पसार होता. शनिवारी त्याला पाटण पोलिसांनी साताऱ्यातील निवासस्थानातून ताब्यात घेऊन अटक केली. न्यायालयाने त्याला मंगळवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक थोरात व पोलीस निरीक्षक एन. आर. चौखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार पगडे, पोलीस कॉन्स्टेबल मुकेश मोरे व उमेश मोरे यांनी ही कारवाई केली.