दरोड्यातील फरार आरोपीला पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2021 04:42 AM2021-09-18T04:42:12+5:302021-09-18T04:42:12+5:30
सातारा : स्थानिक गुन्हे शाखेने दोन कारवाया करत, दरोड्याच्या गुन्ह्यात दोन वर्षांपासून फरार असणाऱ्याला पकडले, तसेच मुंबई, पुणे येथून ...
सातारा : स्थानिक गुन्हे शाखेने दोन कारवाया करत, दरोड्याच्या गुन्ह्यात दोन वर्षांपासून फरार असणाऱ्याला पकडले, तसेच मुंबई, पुणे येथून चोरून आणलेल्या चार दुचाकी हस्तगत करत, दोन संशयितांनाही ताब्यात घेतले.
जिल्ह्यात विविध पोलीस ठाण्यांत गुन्हे नोंद असणारे व फरार आरोपींना पकडणे आणि दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याची सूचना पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल व अतिरिक्त पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेला केली होती. त्याचप्रमाणे, पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांनी शाखेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना गुन्हे उघडकीस आणण्याबाबत सूचना केली होती.
रहिमतपूर पोलीस ठाण्यात दरोड्याच्या गुन्ह्यात नोंद असणारा एक जण दोन वर्षांपासून फरार होता. या आरोपीबाबत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला माहिती मिळाली होती. त्याप्रमाणे, पथकाने वडुज येथून साजन आनंद साळवी (वय १९, रा. इंदिरानगर, वडुज) याला पकडले. त्यानंतर, त्याला पुढील कारवाईसाठी रहिमतपूर पोलिसांच्या ताब्यात दिले.
पुणे, मुंबई येथून दुचाकीची चोरी करून काही जण त्या जिल्ह्यातील ग्रामीण भागात विकत असल्याचे माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. या माहितीच्या आधारे कऱ्हाड तालुक्यातील उत्तर तांबवे येथे दोघा संशयितांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून अडीच लाख रुपयांच्या चार दुचाकी हस्तगत केल्या. पुढील कार्यवाही कऱ्हाड तालुका पोलीस करणार आहेत.
पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. सहायक पोलीस निरीक्षक आनंदसिंग साबळे, पोलीस उपनिरीक्षक गणेश वाघ, हवालदार आतिश घाडगे, साबीर मुल्ला, अमित सपकाळ, प्रमोद सावंत, मंगेश महाडिक, अमोल माने, अर्जुन शिरतोडे, मयूर देशमुख, मोहसीन मोमीन आणि शिवाजी भिसे आदींनी कारवाईत सहभाग घेतला.
......................................................