पश्चिम भागात पावसाची पूर्ण उघडीप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2020 04:02 PM2020-09-30T16:02:16+5:302020-09-30T16:03:43+5:30
सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाची पूर्णपणे उघडीप असून, बुधवारी सकाळपर्यंत कोयनानगर, नवजा आणि महाबळेश्वरला काहीही पाऊस झाला नव्हता. तर पाण्याची आवक कमी झाल्याने कोयनेच्या दरवाजातील विसर्ग बंद असून, पायथा वीजगृहातून अवघा १०५० क्यूसेक सुरू होता. दरम्यान, पूर्व भागात अनेक ठिकाणी पाऊस पडत आहे.
सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाची पूर्णपणे उघडीप असून, बुधवारी सकाळपर्यंत कोयनानगर, नवजा आणि महाबळेश्वरला काहीही पाऊस झाला नव्हता. तर पाण्याची आवक कमी झाल्याने कोयनेच्या दरवाजातील विसर्ग बंद असून, पायथा वीजगृहातून अवघा १०५० क्यूसेक सुरू होता. दरम्यान, पूर्व भागात अनेक ठिकाणी पाऊस पडत आहे.
जिल्ह्याच्या पूर्व भागात मागील काही दिवसांपासून चांगला पाऊस होत आहे. ओढे-नाले वाहू लागले आहेत. या तुलनेत पश्चिमेकडे पाऊस कमी आहे. मागील महिन्यापासून पश्चिम भागात तर तुरळक स्वरुपातच पाऊस पडत आहे.
गेल्या आठवड्यापासून तर पश्चिम भागातील कोयना, नवजा, महाबळेश्वर, तापोळा, कास, बामणोली या भागात पावसाची उघडीप असल्यासारखीच स्थिती आहे. तर दोन दिवसांपासून पूर्णपणे पाऊस थांबला आहे. त्यामुळे पश्चिम भागातील प्रमुख धरणात पाण्याची आवक कमी कमी होत आहे.
कोयनानगर येथे बुधवारी सकाळपर्यंत काहीच पाऊस झाला नाही. तर यावर्षी जूनपासून आतापर्यंत कोयनेला ४३३१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर १०५.२५ टीएमसी क्षमता असणारे कोयना धरण पूर्ण भरले होते. त्यानंतर विसर्ग सुरू करण्यात आला. परिणामी बुधवारी सकाळी कोयना धरणात १०५.१४ टीएमसी पाणीसाठा होता. तर पायथा वीजगृहातून १०५० क्यूसेक विसर्ग सुरू होता. तसेच धरणाच्या दरवाजातील विसर्ग बंदच आहे.
सकाळपर्यंत नवजा आणि महाबळेश्वरला काहीच पाऊस झाला नाही. तर जूनपासून आतापर्यंत नवजा येथे ५०५७ आणि महाबळेश्वरला ५००५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
दरम्यान, सातारा शहरासह परिसरात पावसाची उघडीप कायम आहे. बहुंताशवेळा ढगाळ वातावरण कायम असते. तर पूर्व दुष्काळी भागात काही ठिकाणी चांगला पाऊस होत आहे. यामुळे खरीप हंगमातील पीक काढणीत अडचणी निर्माण होत आहेत.