जिल्ह््याच्या विकासासाठी खच्चून निधी आणणार
By admin | Published: January 29, 2015 09:40 PM2015-01-29T21:40:47+5:302015-01-29T23:29:55+5:30
विजय शिवतारे : २५० कोटींच्या आराखड्याची सदस्यांची मागणी
सातारा : ‘जिल्ह्याच्या विकासासाठी जो काही निधी लागेल, तो निधी राज्य व केंद्र शासनाच्या माध्यमातून आणणार आहे. यात मी कुठेही कमी पडणार नाही. गेल्या वर्षी २२८ कोटींचा जिल्हा आराखडा मंजूर झाला होता. आताही २५० कोटींच्या वर जिल्ह्यासाठी निधी मिळावा, अशी मागणी बहुतांश नियोजन समितीच्या सदस्यांनी केली असून, जास्तीत जास्त निधी आणण्यासाठी मी कटिबध्द आहे,’ अशी माहिती पालकमंत्री विजय शिवतारे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर आायोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. पालकमंत्री म्हणाले, ‘सातारा जिल्ह्यात विविध नावीन्यपूर्ण विकासकामे राबवायची आहेत. पहिल्याच बैठकीत नियोजन समितीच्या सर्व सदस्यांनी चांगले सहकार्य केले. जिल्ह्याच्या विकासासाठी विरोधकांनाही सोबत घेणार आहे. कुठल्या एका पक्षाचा पालकमंत्री नसतो, तर तो जिल्ह्याचा पालकमंत्री असतो, हे मी दाखवून देणार आहे. गेल्यावर्षी २२८ कोटींचा जिल्हा आराखडा होता. राज्यस्तरावरील बैठकांमध्ये यापेक्षा जादा निधी शासनाला मिळविण्यासाठी प्रयत्न करणार आहे. यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दीसाठी राज्य शासनाने शंभर कोटींचा निधी मंजूर केला होता. त्यापैकी दहा कोटींचा निधी जिल्हा परिषदेच्या आॅडिटोरिअम हॉलसाठी लागणार आहे. या कामासाठी एकूण वीस कोटी रुपये लागणार असल्याने डीपीडीसीच्या नियमानुसार हा निधी देता येणार नसला तरी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून पाच कोटींचा निधी मिळविणार आहे. यासाठी आमदार, खासदारांना सोबत घेऊन बैठक घेणार आहे. दिवंगत बाळासाहेब देसाई यांच्या स्मारकासाठीही वाढीव निधी आणणार आहे.’
खासदार उदयनराजे भोसले यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नानुसार जिल्हा क्रीडा संकुलाच्या गुणवत्तेची थर्ड पार्टी तपासणी केली जाणार आहे. येथील बॅडमिंटन कोर्टची दुरवस्था झाली आहे. क्रीडासंकुल बांधल्यानंतर गॅरंटीच्या काळात ते खराब झाले असेल, तर संबंधित ठेकेदाराकडून त्याचे काम करून घेतले जाईल. मात्र, त्याआधी ४४ लाख रुपये खर्चून बॅडमिंटन कोर्टचे काम हाती घेण्यात येईल. टंचाईची बैठक येत्या पंधरा दिवसांत बोलावणार असून, डिपीडीसीच्या सर्व कामांची थर्ड पार्टी तपासणी केली जाणार आहे. नियमाच्या बाहेर जाऊन काम करणार नाही, असेही त्यांनी सांगितले.
यानंतर पालकमंत्र्यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली. जिल्हा बँकेची निवडणूक येत्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. या बैठकीत शिवसेनेचे धोरण काय असणार, या प्रश्नावर बोलताना पालकमंत्री म्हणाले, ‘जिल्ह्यातील प्रत्येक निवडणूक आम्ही लढविणार आहोत. सहकारामध्ये पक्षाचा विचारच येत नाही. समविचारी लोकांना सोबत घेऊन निवडणूक लढविणार आहोत. यातून कितपत यश मिळेल, हे मला माहीत नसले तरी सत्तेला चेक बसविण्याचे काम आम्ही करू.’ (प्रतिनिधी)