प्रश्नावलीतून उलघडले गुन्हेगारांचे फंडे!
By admin | Published: July 5, 2015 09:50 PM2015-07-05T21:50:31+5:302015-07-06T00:24:40+5:30
पोलिसांकडून जनजागृती : फसवणुकीच्या प्रकाराची महिलांना दिली माहिती
सातारा : अनेक वर्षांपासून शहरात सोनसाखळी चोरीचे प्रकार तसेच विविध आमिषे दाखवून महिलांना हातोहात फसविले जात आहे. रोज या घटना घडत असल्याने पोलीस अक्षरश: हतबल झाले आहेत. चोरट्यांना पकडल्यानंतर पुन्हा त्यांना जामीन मिळाल्यानंतर चोरीचे प्रकार वाढतच आहेत. गुन्हेगारांना जरब बसविण्यात कुठेही कसूर ठेवायचा नाहीच ; परंतु त्यापेक्षा महिलांमध्ये जनजागृती केल्यास सोनसाळखी किंवा फसवणुकीचे गुन्हे घडणारचं नाहीत. यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षकांनी अनोखी जनजागृती मोहीम राबवून महिलांना यामध्ये सामावून घेतले आणि गुन्हेगारांचे फंडे कसे असतात, याची माहिती पोहोचविण्याचे उदिष्ट्य साध्य केले.
शहरात सोनसाखळी चोरीचे प्रकार दिवसेंदिवस वाढतच आहेत. सोनसाखळी चोरणारे किंवा विविध आमिषे दाखवून फसवणूक करणारे गजाआड होत आहेत. परंतु तरीही अशा घटना कमी होताना दिसत नाहीत. फसवणूक करणारे लोक शक्यतो महिलांना सावज बनवत असतात. यावर उपाय म्हणून पोलिसांनी अनोखी जनजागृती मोहीम राबवून चोरट्यांचे फंडे कसे असतात, याची प्रश्नावलीच्या माध्यमातून महिलांना माहिती दिली. एवढ्यावरच न थांबता ज्या महिलांनी सर्व प्रश्न सोडविले अशा महिलांना बक्षीसही देण्यात आले. या आगळ्या वेगळ्या गौरवाबरोबरच चोरट्यांच्या कार्यपद्धती कशा असतात, हे महिलांपर्यंत पोहोचविण्याचे उदिष्ट्य साध्य झाल्याने ९० टक्के गुन्हे या मोहीमेमुळे कमी होतील, असा विश्वास पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी व्यक्त केला.
येथील पोलीस करमणूक केंद्रामध्ये महिला सुरक्षा जनजागृती प्रबोधन उपक्रमाचा बक्षिस वितरण साहेळा पार पडला. यावेळी पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, पोलीस निरीक्षक राजीव मुठाणे, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र यादव, हुंबरे, सहायक पोलीस निरीक्षक श्रीगणेश कानगुडे, हेरंब प्रतिष्ठानचे अध्यक्ष नाना इंदलकर, वाहतूक मित्र मधूकर शेंबडे, गुरूनाथ जाधव आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
काय आहे प्रश्नावली ?
पहाटे फिरायला जाताना किंवा सायंकाळी चालताना महिलांनी दागिने परीधान करावेत का ?
महिला व लहान मुलांना संकट समयी मदतीसाठी टोल फ्री कोणता ?
आपले दागिने नेहमी कोठे ठेवावे ?
बाहेर गावी जाताना घराला कोणत्या प्रकारचे कुलूप लावावे ?
महिलांनी गाडीच्या डिकीमध्ये सोने किंवा मोठी रक्कम ठेवणे कितपत योग्य आहे ?
तुमचे पॅनकार्ड नंबर, एटीएम नंबर सांगा. तुम्हाला बक्षिस लागले आहे. तुमचे गॅस अनुदान जमा करायचे आहे. अशी माहिती तुम्हाला फोनवर विचारल्यास तुम्ही काय कराल ?
अनोळखी व्यक्तिच्या वाहनावर लिफ्ट द्यावी किंवा घ्यावी, हे योग्य आहे का ?