नवीन पुलासाठी निधी मंजूर; पण जुन्याच्या दुरुस्तीचं काय?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 05:12 AM2021-03-13T05:12:00+5:302021-03-13T05:12:00+5:30
कऱ्हाड : रेठरे बुद्रुक येथील कृष्णा नदीवर नवीन पूल बांधण्यासाठी निधी मंजूर झाला आहे; त्यासाठी राज्याच्या अर्थसंकल्पात ...
कऱ्हाड : रेठरे बुद्रुक येथील कृष्णा नदीवर नवीन पूल बांधण्यासाठी निधी मंजूर झाला आहे; त्यासाठी राज्याच्या अर्थसंकल्पात ४५ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली असल्याच्या बातम्या ऐकून कृष्णाकाठ परिसरात उत्साहाचे वातावरण आहे. परंतु, जुन्या पुलाच्या दुरुस्ती कामाचं काय? असा प्रश्नही लोक विचारु लागले आहेत.
दोन वर्षांपूर्वी महापुरात तब्बल तीन दिवस जलसमाधी मिळालेला येथील रेठरे पूल वर्षभरापूर्वीपासून अवजड वाहनांच्या वाहतुकीसाठी बंद करण्यात आला तो अद्याप बंदच आहे. त्यामुळे परिसरातील सर्वच घटकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. पुलाच्या दुरुस्तीसाठी निधी मंजूर झाला आहे हेही खरे परंतु प्रत्यक्ष काम कधी सुरू होणार, याकडे सर्वांचे डोळे लागले आहेत.
ऑगस्ट २०१९च्या महापुरात सलग तीन दिवस हा पूल पुराच्या पाण्याखाली होता. त्यामुळे पुलाच्या पाच पिलरला धोका निर्माण झाला आहे. बांधकाम विभागामार्फत सुरक्षेसाठी या पुलावरून अवजड वाहनांची वाहतूक पूर्णपणे बंद केली आहे. पुलाच्या दुरुस्तीचे काम आज चालू होईल, उद्या चालू होईल, अशा अपेक्षा बाळगत रेठरेकर पुलाचे दुरुस्ती काम सुरू होण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत.
रेठरे पुलाच्या दुरुस्तीसाठी येथील नेतेमंडळींसह गावातील तरुण सामाजिक कार्यकर्त्यांनीही पुढाकार घेतला होता. गावातील तरुण कार्यकर्त्यांनी पूल दुरुस्तीच्या कामाला निधी मिळावा म्हणून हजारो लोकांच्या सह्यांचे निवेदनही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठवले होते. तसेच माजी मुख्यमंत्री व कऱ्हाड दक्षिणचे विद्यमान आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी पूल दुर्घटनेवेळी प्रत्यक्ष पुलाची पाहणी केली होती आणि पुलाच्या दुरुस्ती कामासाठी निधी मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते.
सध्या राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे. यामधील प्रमुख घटक असणारे आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी सन २०१९-२० या आर्थिक वर्षासाठी सुचवलेल्या ग्रामीण भागातील मूलभूत सुविधा पुरवणे या योजनेतून कऱ्हाड दक्षिणसाठी निधी मागितला होता. त्यामध्ये रेठरे पूल दुरुस्तीसाठी ५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. हा निधी या पुलाच्या दुरुस्ती कामासाठी मंजूर झाला आहे. त्यानुसार संबंधित विभागामार्फत दुरुस्तीचे काम कधी चालू होणार आहे, हेही महत्त्वाचे आहे. मध्यंतरी कोरोना महामारीमुळे पुलाच्या दुरुस्तीचे काम थांबले होते. ते आता कधी सुरू होणार, अशी विचारणा जनतेतून केली जात आहे.
पूल नादुरुस्त असल्यामुळे पुलावरून वहातुक बंद करण्यात आली आहे. याचा परिसरातील सर्वच लोकांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.यामध्ये प्रामुख्याने ऊस उत्पादक शेतकऱयांचा मोठ्या प्रमाणावर तोटा झाला आहे.सातारा व सांगली जिल्ह्यातील अनेक गावातील ऊस येथील साखर कारखान्याला येत असतो.परिसरातील वाठार,कालवडे,बेलवडे मालखेड तसेच कराड परिसरातील विविध गावातील शेतकऱयांचा ऊस याच रेठरे पुलावरून वाहतुक केला जातो. परंतु गेले वर्षभरापासून पूल नादुरुस्त असल्यामुळे वहातुकीचा मार्ग वळविण्यात आला आहे,त्यामुळे लांबपल्ल्याच्या वाहातुकीमुळे वेळ वाया जात आहेच शिवाय आर्थिक फटका मोठ्याप्रमाणावर बसत आहे,
चौकट--
रेठरे पूल आणि दिड वर्षे थांब ...
सन २००६ मध्ये रेठरे पूलाचा पिलर खचल्यामुळे नादुरुस्त झाला होता. तेव्हा दुरुस्तीच्या कामासाठी ग्रामस्थांना दिड वर्षे वाट पाहावी लागली होती.आणि आताही सन २०१९ मध्ये महापुरामुळे नादुरुत झालेल्या याच पुलाच्या दुरुस्तीकामासाठी जवळपास दीड वर्षे होऊन गेली तरी अध्याप काम सुरू नाही.
फोटो :
रेठरे बुद्रुक येथील दुरुस्तीच्या प्रतिक्षेत असणारा हाच तो पुलं.