बाटेवाडीत टाकी बांधण्यासाठी निधीची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:48 AM2021-07-07T04:48:15+5:302021-07-07T04:48:15+5:30
चाफळ : चाफळ विभागातील बाटेवाडी येथे गेल्या पंधरा दिवसांत झालेल्या अतिवृष्टीमुळे पिण्याच्या पाण्याची सार्वजनिक टाकी कोसळली. यामुळे या ...
चाफळ : चाफळ विभागातील बाटेवाडी येथे गेल्या पंधरा दिवसांत झालेल्या अतिवृष्टीमुळे पिण्याच्या पाण्याची सार्वजनिक टाकी कोसळली. यामुळे या ठिकाणी पाणीटंचाई निर्माण झाली आहे. गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी या ठिकाणी पाण्याची टाकी बांधण्यासाठी निधी देण्याची मागणी बाटेवाडी ग्रामस्थांनी केली आहे.
केळोलीपासून चार किलोमीटर अंतरावर बाटेवाडी आहे. पाठवडे ग्रामपंचायती अंतर्गत समावेश होणाऱ्या या बाटेवाडी गावात १९९९ मध्ये शंभूराज देसाई यांच्या माध्यमातून व कारखान्याच्या भाग विकासनिधीमधून पाण्याची टाकी बांधण्यात आली होती. या टाकीतूनच संपूर्ण बाटेवाडी गावास पाणीपुरवठा केला जात होता. मात्र पंधरा दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमध्ये या टाकीची एका बाजूची भिंत अचानकपणे कोसळली. त्यामुळे गावातील पाणीपुरवठा बंद झाला आहे. या टाकीची पाहणी करून पंचनामा करण्याच्या सूचना गृहराज्यमंत्री देसाई यांनी पाणीपुरवठा विभागास दिल्या आहेत.
या टाकीच्या पडझडीची पाहणी संजय गांधी निराधार योजनेचे पाटण तालुकाध्यक्ष भरत साळुंखे, शिवदौलत बँकेचे संचालक चंद्रकांत पाटील, रामचंद्र जाधव, संजय जाधव, यशवंत जाधव, उपसरपंच लता तोरस्कर, ग्रामपंचायत सदस्य अर्चना जाधव, वंदना तोरसकर व बाटेवाडी ग्रामस्थांनी करत नवीन टाकी बांधकामासाठी प्रस्ताव पाठवण्याच्या सूचना साळुंखे यांनी केल्या.