मंदिरासाठी निधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:58 AM2021-02-23T04:58:52+5:302021-02-23T04:58:52+5:30
सातारा : करंजेपेठ येथील महादेव प्रभू प्रतिष्ठानने अयोध्यातील श्रीराम मंदिराच्या उभारणीनिमित्ताने निधीचा धनादेश विश्व हिंदू परिषदेच्या न्यासाकडे सुपूर्द केला. ...
सातारा : करंजेपेठ येथील महादेव प्रभू प्रतिष्ठानने अयोध्यातील श्रीराम मंदिराच्या उभारणीनिमित्ताने निधीचा धनादेश विश्व हिंदू परिषदेच्या न्यासाकडे सुपूर्द केला. यावेळी अध्यक्ष भाऊसाहेब स्वामी, सागर मलवडे, मोहन साठे, भंडारे उपस्थित होते. बाबूजी नाटेकर यांच्याकडे धनादेश सुपूर्द केला.
-----------
ज्वारीचे नुकसान
कुडाळ : गेल्या काही दिवसांपासून वातावरणात बदल झालेला आहे. ढगाळ वातावरण, पावसाची परिस्थिती तर कधी थंडीचा कमी-अधिकपणा जाणवत आहे. अशातच रविवारपासून दिवसा वाऱ्याचा झोत वाढलेला आहे. भागात ज्वारीच्या पिकाची कणसे भरली असून यामुळे भार न पेलवणारे ज्वारीचे पीक वाऱ्याच्या झोतामुळे पडल्याचे दिसत आहे. वातावरणातील बदलामुळे ज्वारीचे नुकसान होत आहे.
०००००००
पुनर्वसित पानस शाळेत उपक्रम
कुडाळ : पुनर्वसित पानस शाळेत विद्यार्थी उपयोगी वाढदिवस उपक्रम राबविला जात आहे. यामध्ये सुप्रिया सचिन चौधरी व आस्था सचिन चौधरी यांनी प्रत्येक विद्यार्थ्याला टिफीन बॉक्स, गोष्टीचे पुस्तक व खाऊचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी मुख्याध्यापिका पवित्रा फरांदे, राजेंद्र कदम उपस्थित होते.
-----------
वीज चोरीकडे दुर्लक्ष
पुसेसावळी : खटाव तालुक्यातील अनेक भागांत वीजवाहक तारांवर आकडे टाकून वीज चोरी केली जात आहे. अगोदरच अव्वाच्या सव्वा वीज बिल लादले जात असल्याने ग्राहकांना वीज कंपनी झटका देत आहे. अशाप्रकारे वीज चोरी करणाऱ्यांना पकडून त्यांच्यावर कारवाई करण्याची तसदी घ्यावी, अशी मागणी केली जात आहे.
०००००००००ढ़
शहरातील ट्रक वाहतूक
सातारा : साताऱ्यातील काही भागात अरुंद रस्ते आहेत. त्यातच माल वाहतूक करणारे ट्रक रस्त्यात कित्येक वेळ थांबलेले असतात. त्यामुळे इतर वाहनचालकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे त्याचा बंदोबस्त करावा, त्यांना ठरावीक वेळ ठरवून द्यावी, अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.
०००००००
एसटीच्या उत्पन्नामध्ये महिन्यात वाढ
सातारा : राज्य परिवहन महामंडळाने लॉकडाऊनमुळे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी मोठ्या प्रमाणावर उपाययोजना राबविण्यास सुरुवात केली आहे. त्यादृष्टीने फेऱ्यांचे नियोजन केले जात आहे. त्यामुळे कऱ्हाड आगाराच्या उत्पन्नास वीस दिवसांमध्ये तीस लाख रुपयांनी वाढ झाली आहे, अशी माहिती आगार व्यवस्थापक विजय मोरे यांनी दिली.
००००००
वाळू वाहतूक खुलेआम
सातारा : खटाव तालक्यातील ललगुण परिसरात खुलेआमपणे वाळू वाहतूक सुरू आहे. यामुळे निसर्गाचा मोठ्या प्रमाणावर ऱ्हास होत आहे. अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या तीन ट्रॅक्टर चालकावर महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी कारवाई केली. याप्रमाणेच यापुढेही कारवाई कायम करावी, अशी मागणी केली जात आहे.
००००००
माझी वसुंधरा मोहीम
सातारा : जिल्ह्यातील बहुतांश शहरांमध्ये माझी वसुंधरा हे अभियान प्रभावीपणे राबविले जात आहे. यामध्ये प्लास्टिक पिशव्यांचा वापर करणाऱ्यांवर बंदी आणणे. पेट्रोल, डिझेलऐवजी इलेक्ट्रिक वाहने वापरण्यास प्रोत्साहन देण्यावर भर दिला जात आहे. यासाठी खास अभियान राबवून जनजागृती केली जात आहे.
००००००
शिरढोणमध्ये वृक्षदिंडी काढून शिवजयंती
सातारा : कोरेगाव तालुक्यातील शिरढोण येथे शिवजयंतीनिमित्ताने वृक्षदिंडी काढून वृक्षारोपण करण्यात आले. शिरढोणमध्ये सह्याद्री देवराईअंतर्गत वृक्षारोपणासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. यामध्ये अनेक ज्येष्ठ नागरिक, महिला, लहान मुलं सहभागी झाले होते. बाल शिवाजी यांचा पेहराव करून एक चिमुरडाही सहभागी झाला होता. तो सर्वांचे लक्ष वेधून घेत होता.
२२शिरढोण