निधी उपलब्ध; तरीही काम होईना
By admin | Published: January 11, 2016 09:46 PM2016-01-11T21:46:53+5:302016-01-12T00:30:04+5:30
प्रशासनाची दिरंगाई : गाढवेवाडी तलावाचे काम रखडले; ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा
वाई : तालुक्यातील गाढवेवाडी येथील ग्रामस्थांनी शेती व पिण्याच्या पाण्यासाठी आक्रमक पवित्रा घेतला आहे. कारण येथील पाझर तलावाचे काम रखडले आहे. या अपूर्ण कामासाठी आंदोलनाचा इशारा देत प्रांताधिकारी अस्मिता मोरे व सातारा येथील लघू पाटबंधारे खात्याला निवेदनही दिले आहे. दरम्यान, येथील तलावाच्या कामासाठी निधी उपलब्ध असतानाही प्रशासनाच्या उदासीपणाचा फटका सर्वांना बसत आहे.
गाढवेवाडीच्या पाझर तलावासाठी ९२ लाखांचा निधी मंजूर झाला असून, भूसंपादनासाठीचा पाच लाखांचा निधीही जमा झाला आहे. पाझर तलावासाठी लागणारी जमीनही संपादित करण्यात आली आहे. शेतकऱ्यांची संमती असतानाही लघू पाटबंधारे खात्याच्या गलथान कारभारामुळे शेतकऱ्यांना संपादित जमिनीचा मोबदला मिळाला नाही. तसेच अद्याप पाझर तलावाचे काम अर्धवट स्थितीत पडून आहे़ त्यामुळे पाझर तलावाच्या कामात अडचणी निर्माण झाल्या आहेत. पाझर तलावाच्या कामात एका शेतकऱ्याने अडथळा आणला आहे. एकाच्या विरोधामुळे संपूर्ण गावाला वेठीस धरण्यात आले आहे.
धोम परिसरात डोंगरावर अतिशय दुर्गम भागात गाढवेवाडी येते. समोर धोम धरणाचे अथांग पाणी दिसत असतानाही वाई तालुक्यात गाढवेवाडीला सर्वात आधी पिण्याच्या पाण्यासाठी टँकर सुरू करावा लागतो. ही दुर्दैवी बाब आहे. एकाच्या हितासाठी गावाला वेठीस धरणे ही प्रशासनाकडून होणाऱ्या दिरंगाईचे समर्थन केल्यासारखेच आहे. पाटबंधारे खात्याने गांभीर्याने त्वरित पिणे व शेतीच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी पाझर तलावाचे काम सुरू करून न्याय द्यावा; अन्यथा ग्रामस्थ २६ जानेवारीला तहसील कार्यालयासमोर उपोषणास बसणार आहेत. याची सर्व जबाबदारी संबंधित विभागाची असेल, असा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे़
या निवेदनावर माजी सरपंच रवींद्र भिलारे, बळवंत सणस, आनंदराव सणस, बापूराव सणस, मारुती चिकणे, भरत चिकणे, आबासाहेब चिकणे, जिजाबा चिकणे, प्रभाकर जाधव, तुकाराम पवार, मारुती चिकणे, एकनाथ जाधव, मनीषा चिकणे, उषा चिकणे, शोभा सणस, मंगल सणस आदींच्या सह्या आहेत. निवेदन देण्यासाठी महिला व पुरुष मोठ्या संख्यने उपस्थित होते. (प्रतिनिधी)
प्रांत म्हणून नुकताच पदभार स्वीकारलेला आहे. ग्रामस्थांशी झालेल्या चर्चेवरून या गावात पिण्याच्या पाण्याची टंचाई असल्याचे लक्षात आले आहे. पाझर तलावामुळे या गावाचा पाण्याचा प्रश्न कायमचा संपणार असेल तसेच महसूल विभागाकडून कोणतीही दिरंगाई झाली असल्यास मी स्वत: लक्ष घालून तलावाच्या कामाचा प्रश्न मार्गी लावणार आहे.
- अस्मिता मोरे,
प्रांताधिकारी वाई
प्रशासनाने तातडीने पावले उचण्याची गरज
शेतकऱ्यांनाही पाण्याचे महत्त्व माहीत आहे. त्यामुळे शेतकरी आपल्या जमिनी गावाच्या हितासाठी प्रकल्पाला देत असतात; पण प्रशासनाच्या कासवगतीमुळे शेतकऱ्यांची कुंचबणा होत आहे. हे टाळण्यासाठी संबंधित विभागाने अशा प्रकारच्या प्रकल्पांमधील अडचण त्वरित दूर करून त्या मार्गी लावल्यास प्रकल्पांचा खर्चही वाढणार नाही व शेतकऱ्यांची कुंचबणाही होणार नाही़, अशी अपेक्षा ग्रामस्थांतून व्यक्त होत आहे.
अभियंत्यांकडून अरेरावीची भाषा...
ग्रामस्थ साताऱ्याच्या लघू पाटबंधारे खात्याच्या कार्यकारी अभियंत्यांकडे निवेदन देण्यासाठी गेले होते. त्यावेळी ग्रामस्थांना उद्धट व अरेरावीची भाषा वापरण्यात आली. गावाचे प्रश्न गावपातळीवर सोडवावेत. आम्हाला नवरा-बायकोचे भांडण सोडविण्यास भाग पाडता का? असा सवाल करण्यात आला. तुमचा प्रश्न न्यायालयीन आहे. तो तिथूनच सोडवून घ्यावा. असे उद्धट उत्तर देत ग्रामस्थांना हाकलून लावले.
- रवींद्र भिलारे, गाढवेवाडी माजी सरपंच