दुष्काळी भागाच्या पाणीपुरवठा योजनांसाठी निधी कमी पडू देणार नाही - देवेंद्र फडणवीस
By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2024 11:59 AM2024-02-26T11:59:23+5:302024-02-26T11:59:45+5:30
आंधळी धरणात जिहे-कठापूर योजनेच्या पाण्याचे पूजन
सातारा : तारळी, धोम, बलकवडी, टेंभू, म्हैसाळ, नीरा-देवधर या प्रकल्पांवरील दुष्काळी भागाला वरदान ठरणाऱ्या सर्व योजना मोठ्या प्रमाणावर गतीने पूर्ण करण्यात येतील. गेल्या दीड वर्षाच्या कालखंडात १२१ कामांना मंजुरी दिली आहे. यातून महाराष्ट्रातील १५ लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे. दुष्काळी भागाच्या पाणीपुरवठा योजना पूर्ण करण्यासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही,’ अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
माण तालुक्यातील आंधळी धरणावरील गुरुवर्य लक्ष्मणराव इनामदार उपसा सिंचन योजना (जिहे-कठापूर)चे जलपूजन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी आयोजित सभेत ते बोलत होते.
यावेळी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, खासदार उदयनराजे भोसले, खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, आमदार जयकुमार गोरे, आमदार राहुल कूल, माजी आमदार दिलीप येळगावकर, मदन भोसले, जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर, कृष्णा खोरेचे कार्यकारी संचालक अतुल कपोले, मुख्य अभियंता पुणे हनुमंत गुनाले, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, सातारा सिंचन मंडळ अधीक्षक अभियंता अरुण नाईक, पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता जयंत शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.
फडणवीस म्हणाले, ‘अनेक दशके थेंब-थेंब पाण्यासाठी व्याकूळ असणाऱ्या भूमीत जलपूजन करण्याची संधी मिळाली आहे, याचा मनस्वी आनंद होत आहे. माण-खटाव तालुक्यांतील दुष्काळाचा कलंक पुसण्यासाठी जिहे-कठापूर योजनेला फेरमान्यता देण्यात आली आहे. त्यातून माण तालुक्यातील २७ गावे व खटाव तालुक्यातील ४० गावी, अशी एकूण ६७ गावे व त्यातील १ लाख ७५ हजार ८०३ लाभधारकांसाठी या पाण्याचा वापर होणार आहे. यातून २७ हजार ५०० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे.
या योजनेसाठी जवळपास १,३३१ कोटींची प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर लाभ होणार होऊन पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. दुष्काळी भागापर्यंत कशाप्रकारे पाणी पोहोचू शकते, याचे मोठे मॉडेल तयार झाले आहे. जे पाणी वाहून जाते ते वाचविण्यासाठी बंदिस्त पाइपलाइनद्वारे पाणी देण्यास सुरुवात केलीय. त्यामुळे राज्यभरात आठ टीएमसी पाण्याचे फेरवाटप करून दुष्काळी भागाला ते उपलब्ध करून देऊ शकलो.