कोरोनाविरोधातील लढ्यासाठी पाऊण लाखाचा निधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2021 04:36 AM2021-05-01T04:36:06+5:302021-05-01T04:36:06+5:30
खंडाळा : कोरोनाने खंडाळा तालुक्यातील अंदोरी गावात थैमान घातले आहे. दुसऱ्या लाटेत रुग्णांची संख्या शंभरी पार गेली आहे. कोरोनाच्या ...
खंडाळा : कोरोनाने खंडाळा तालुक्यातील अंदोरी गावात थैमान घातले आहे. दुसऱ्या लाटेत रुग्णांची संख्या शंभरी पार गेली आहे. कोरोनाच्या विळख्यातून गावाला बाहेर काढण्यासाठी ग्रामपंचायत व आपत्ती व्यवस्थापन समिती विविध उपाययोजना करीत आहे. गावासाठी सुरू केलेल्या विलगीकरण कक्षात रुग्णांना सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी गावच्या श्रीभैरवनाथ देवस्थान ट्रस्टने सहकार्याची भूमिका घेऊन या कामासाठी पाऊण लाखाचा निधी उपलब्ध करून दिला आहे.
तालुक्यात कोरोनाचा प्रसार वेगाने होत आहे. कोरोनाविरुद्धचा लढा आणखी मजबूत करण्यासाठी आरोग्याच्या सुविधा उपलब्ध करणे आवश्यक आहे. लोकांची काळजी घेण्यासाठी वैद्यकीय विभागाच्या सहकाऱ्याने अंदोरी ग्रामपंचायत व व्यवस्थापन समितीने प्राथमिक शाळेत स्वतंत्र विलगीकरण कक्ष स्थापन केला आहे. कोरोनाची साखळी तुटावी, यासाठी कमी लक्षणे असलेल्या रुग्णांची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली आहे. तसेच बाधित ठिकाणी प्रतिबंधित क्षेत्र करून जंतुनाशक औषधाची फवारणी करण्याचे कामही सुरू आहे. त्याचबरोबर रुग्णांना आवश्यक औषधे उपलब्ध करून देणेही गरजेचे असल्याने श्रीभैरवनाथ देवस्थान ट्रस्टने ७५ हजार रुपयांचा निधी ग्रामपंचायतीकडे सुपूर्द केला. त्यामुळे गावात रुग्णांना सुविधा पुरविण्यासाठी हातभार लागणार आहे. त्याचबरोबर गावातील गरजू कुटुंबांना धान्य व किराणा साहित्याचे वाटपही करण्यात आले.
देवस्थान ट्रस्टच्या वतीने अध्यक्ष श्यामराव धायगुडे यांच्या हस्ते सरपंच प्रदीप होळकर यांच्याकडे हा निधी देण्यात आला. यावेळी माजी उपसरपंच अशोक धायगुडे, डॉ. नानासाहेब हाडंबर, दत्तात्रेय धायगुडे, ग्रामविकास अधिकारी रवींद्र धायगुडे यासह प्रमुख उपस्थित होते.