जवान सोमनाथ मांढरे यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 04:44 AM2021-09-21T04:44:36+5:302021-09-21T04:44:36+5:30
पाचवड : वाई तालुक्यातील आसले येथील पांडवनगर येथे जवान सोमनाथ मानसिंग मांढरे यांच्या पार्थिवावर सोमवारी सकाळी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार ...
पाचवड : वाई तालुक्यातील आसले येथील पांडवनगर येथे जवान सोमनाथ मानसिंग मांढरे यांच्या पार्थिवावर सोमवारी सकाळी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. पहाटे सहाच्या सुमारास पुणे येथून त्यांचे पार्थिव आसले येथील घरी आणण्यात आले. त्यानंतर, फुलांनी सजविलेल्या ट्रॅक्टरमधून त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. यावेळी ‘वीर जवान सोमनाथ मांढरे अमर रहे’च्या जयघोषाने परिसर दुमदुमला होता.
सोमनाथ मांढरे हे २००५ मध्ये भारतीय सैन्य दलामध्ये भरती झाले होते. त्यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा आसले येथे, तर माध्यमिक शिक्षण महात्मा गांधी विद्यालय पाचवड येथे झाले. घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. त्यांची आई आजारी असायची व वडील मजुरी करून प्रपंच चालवित होते. सोमनाथ यांना तीन मोठ्या बहिणी व एक लहान भाऊ आहे. त्यांचे आई व वडील सध्या हयात नसून, त्यांच्या लहान भावाचे लग्न झाले आहे. सोमनाथ यांच्या पश्चात पत्नी व मुलगा, मुलगी असा परिवार आहे. त्यांची सेवानिवृत्ती ६ महिन्यांमध्ये होणार होती. मात्र, त्या आधीच काळाने त्यांच्यावर घाला घातला. लडाख येथे ऑक्सिजनच्या कमतरेतमुळे त्यांना त्रास जाणवू लागला होता. त्यामुळे त्यांना मिलिटरी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तेथेच त्यांचा मृत्यू झाला. त्यांनी जबलपूर, जम्मू काश्मीर, पालनपूर व लडाख या ठिकाणी आत्तापर्यंत सेवा बजावली आहे.
अंत्यसंस्काराच्या वेळी कोल्हापूर येथील स्टेशन कमांडर यांच्या तुकडीने व जिल्हा पोलीस दलाच्या तुकडीने हवेत बंदुकीच्या तीन फैरी झाडून वीर जवान सोमनाथ मांढरे यांना अखेरची सलामी दिली, तर महाराष्ट्र शासनाच्या वतीने पालकमंत्री बाळासाहेब पाटील, आमदार मकरंद पाटील, माजी आमदार व किसन वीर कारखान्याचे अध्यक्ष मदन भोसले, अप्पर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, वाईचे उपविभागीय दंडाधिकारी राजेंद्र जाधव, तहसीलदार रणजीत भोसले, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. शितल जाणवे-कऱ्हाडे, पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे, सहायक पोलीस निरीक्षक आशिष कांबळे यांनी पुष्पचक्र वाहून आदरांजली वाहिली. सोमनाथ मांढरे यांचे सुपुत्र राजवीर यांनी भडाग्नी दिला.
फोटो २०आसले जवान
आसले येथे सोमवारी वीर जवान सोमनाथ मांढरे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. (छाया : महेंद्र गायकवाड)