चाळीस लाखांच्या विम्यासाठी नसलेल्या बापावर अंत्यसंस्कार, सातारा जिल्ह्यातील अजब घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2022 03:43 PM2022-04-28T15:43:03+5:302022-04-28T15:44:04+5:30
जड अंतःकरणाने मुलाने वडिलांवर काही मोजक्याच नागरिकांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार केले पण जेव्हा पोलिसांच्या चाणाक्ष नजरेने मुलाचे आटलेले अश्रू टिपले तेव्हा भलताच प्रकार समोर आला.
दत्ता यादव
सातारा : रुग्णालयातील स्ट्रेचरवर वडिलांचा मृतदेह पाहून मुलाने हंबरडा फोडला. 'बाबा,' अशी हाक मारून वडिलांच्या मृतदेहाला त्याने मिठीही मारली. हे पाहून उपस्थित पोलीस आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनाही गहिवरून आलं. कागदोपत्री सोपस्कार पूर्ण केल्यानंतर मृतदेह अंत्यविधीसाठी मुलाच्या ताब्यात देण्यात आला. जड अंतःकरणाने मुलाने वडिलांवर काही मोजक्याच नागरिकांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार केले पण जेव्हा पोलिसांच्या चाणाक्ष नजरेने मुलाचे आटलेले अश्रू टिपले तेव्हा भलताच प्रकार समोर आला.
विडणी (ता. फलटण) गावच्या हद्दीतील विडणी-पंढरपूर रस्त्यावर एक अनोळखी पुरुष जातीचा बेवारस मृतदेह पोलिसांना आढळला. या व्यक्तीचा मृतदेह फलटणमधील उपजिल्हा रुग्णालयामध्ये ठेवण्यात आला. त्यांची ओळख पटावी म्हणून पोलिसांनी व्हॉटस अॅपवर त्या व्यक्तीचा फोटो व्हायरल केला. त्यावेळी हा फोटो पाहून दादा विलास सुरवसे (वय ३७, रा. मॉडनिंब, ता. माढा, जि. सोलापूर) हा रुग्णालयात गेला. मृतदेह पाहताच त्याने एकच हंबरडा फोडला.
सरतेशेवटी स्वत: ला सावरून त्याने वडिलांचा मृतदेह ताब्यात घेतला. रुग्णवाहिकेने मृतदेह विडणी येथे राहात असलेल्या ठिकाणी नेऊन त्याने अंत्यसंस्कार केले पण दुसऱ्या दिवशी सकाळी पोलिसांना दादा सुरवसेनं वडिलांचा मृतदेह नेताना कोणालाच बोलावलं नाही. गावकडं मृतदेह नेण्याऐवजी त्यानं विडणीतच अंत्यसंस्कार का केले, अशा शंका आल्या.
तिसऱ्या दिवशी पोलीस उपनिरीक्षक सागर अरगडे हे आपल्या पथकासह दादाच्या मॉडनिंब गावातील घरी पोहोचले तेव्हा दादाचे वडील विलास मुरलीधर सुरवसे (वय ६२) यांचे एक वर्षांपूर्वीच निधन झाले आहे, असे घरच्यांनी सांगितले. त्यानंतर सुरवसेच्या घरातल्यांना काही एक न सांगता पोलीस पथक तातडीने फलटणकडे निघाले. तसेच फलटण पोलिसांना सूचना दिल्या. त्यानंतर पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता दादा सुरवसेला ताब्यात घेतले.
तो होता मृतदेहाच्या शोधातच...
वडील विलास सुरवसे यांच्या नावावर एका बँकेचा तब्बल ४० लाखांचा विमा होता. मात्र, वडिलांचे अचानक निधन झाल्याने त्याला विम्याची रक्कम घेता आली नाही. त्यामुळे तो बेवारस मृतदेहाच्या शोधातच होता. पैशांसाठी स्वतःच्या वडिलांना विसरून त्यांने दुसऱ्याच्या बापाला बाप मानलं. आधारकार्ड, पॅनकार्ड सेल्फ अॅटेस्टेड करून त्यानं बेवारस मृतदेह आपल्या वडिलांचा असल्याचं भासवलं पण पोलिसांच्या कौशल्यामुळे त्याचा भंडाफोड झाला.