तरुण मतदारच ठरविणार यावेळी खासदारांचे भवितव्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2019 11:22 PM2019-04-08T23:22:47+5:302019-04-08T23:22:53+5:30

शरद जाधव । लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी ऐन रंगात आली असताना, खासदार निवडताना चाळिशीच्या आतील ...

Future of MPs to decide on young voters | तरुण मतदारच ठरविणार यावेळी खासदारांचे भवितव्य

तरुण मतदारच ठरविणार यावेळी खासदारांचे भवितव्य

Next

शरद जाधव ।
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी ऐन रंगात आली असताना, खासदार निवडताना चाळिशीच्या आतील मतदारांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. जिल्ह्यात चाळिशीच्या आतील ९ लाख ८९ हजार मतदारांची संख्या असून, ही एकूण मतदारांच्या ४२ टक्क्यापर्यंत असल्याने सांगली आणि हातकणंगले या दोन्ही मतदारसंघातील नवीन खासदार हेच मतदार ठरविणार आहेत.
सांगली जिल्ह्यात एकूण २३ लाख ५० हजार ३५९ मतदार आहेत. यात चाळिशीच्या आतील ९ लाख ८९ हजार ४२ मतदार आहेत. प्रशासनाने राबविलेल्या मतदार नोंदणी अभियानामुळे जिल्ह्यात ५४ हजार ८६३ मतदारांची नव्याने भर पडली आहे. चाळिशीच्या आतील मतदार हे मतदानासाठी उत्साही असतात व त्यांचा सहभागही वाढलेला असतो. त्यामुळे त्यांचे मतदान सर्वच उमेदवारांसाठी निर्णायक ठरणार आहे. यातही ३० ते ३९ वर्षे पूर्ण झालेले ४ लाख ९२ हजार ३५५ मतदार आहेत.
जिल्हा प्रशासनाने सप्टेंबरपासून मतदार नोंदणीसाठी विशेष मोहीम राबविली होती. त्याचाही फायदा होत आहे. ज्येष्ठ मतदारांचीही संख्या मोठी असली तरी, तुलनेने चाळिशीच्या आतील मतदारांच्या मतांवरच संसदेतील प्रतिनिधी ठरण्याची चिन्हे आहेत.
उमेदवारांचीही : तरुणांवर मदार
प्रचार यंत्रणा राबवित असताना उमेदवारांनीही तरुणांवर लक्ष केंद्रित केले आहे. सोशल मीडियाचाही प्रचारासाठी वापर होत असताना, त्याचा वापर करणारी पिढीही सर्वाधिक याच वयोगटातील असल्याने उमेदवारांनीही चाळिशीच्या आतील मतदार आपल्याकडे येतील, याचे नियोजन केले आहे. उमेदवारांनीही आवर्जून तरुणांसाठी प्रचार अभियान राबविले आहे.
हातकणंगले मतदारसंघातही मदार तरुणांवरच
जिल्ह्यातील वाळवा व शिराळा विधानसभा मतदारसंघांचा हातकणंगले लोकसभा मतदारसंघात समावेश आहे. या दोन तालुक्यातीलही चाळिशीच्या आतील मतदारच निर्णायक ठरणार आहेत. इस्लामपूर मतदारसंघात २ लाख ६८ हजार ०८७ मतदार आहेत, तर शिराळ्यामध्ये २ लाख ९० हजार १४१ मतदार आहेत.
ज्येष्ठ मतदारही ठरणार श्रेष्ठ
सांगली जिल्ह्यातील एकूण मतदारसंख्येचा आढावा घेताना निर्णायक ठरणारे ४२ टक्के तरूणांचे मतदान असले तरी, त्यापुढील वयोगटातही मतदारांची संख्या उल्लेखनीय आहे. त्यानुसार ६० ते ८० पेक्षा अधिक वयोगटातील मतदारांची संख्या पाच लाख १० हजार ८१२ आहे. आजवर झालेल्या निवडणुकीतील मतांचा आढावा घेतला, तर तरूणांबरोबरच ज्येष्ठ मतदार आवर्जून मतदानासाठी उत्सुक असतात. त्यामुळे अनेक पावसाळे पाहिलेल्या या मतदारांवरही उमेदवारांची भिस्त असणार आहे. मात्र, तरीही प्रचारासाठी कार्यरत असलेल्या कार्यकर्त्यांना या वयोगटातील ज्येष्ठांना मतदानासाठी बाहेर काढताना मोठी कसरत करावी लागणार आहे.

Web Title: Future of MPs to decide on young voters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.