उंडाळकर गडकरींच्या तर गडकरी राजाभाऊंच्या भेटीला!
By admin | Published: March 27, 2016 09:31 PM2016-03-27T21:31:18+5:302016-03-27T23:59:46+5:30
भाजपच्या इतर नेत्यांबरोबरच ज्येष्ठ नेते राजाभाऊ देशपांडे यांनीही त्यांचे स्वागत केले. त्यानंतर गडकरी कार्यक्रमस्थळी रवाना झाले.
कऱ्हाड : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी शनिवारी कऱ्हाड दौऱ्यावर असताना भाजपचे ज्येष्ठ नेते राजाभाऊ देशपांडे यांच्या भेटीला त्यांच्या निवासस्थानी पोहोचले; पण राजाभाऊ देशपांडे बाहेर गेल्याने त्यांची भेट होऊ शकली नाही. दरम्यान, माजी मंत्री विलासराव पाटील-उंडाळकर यांनीही विमानतळावर गडकरींची भेट घेतली. पाचवडेश्वर-कोडोली दरम्यान पुलासाठी २४ कोटी निधीला मंजुरी मिळावी, अशी मागणी उंडाळकरांनी केली. कृष्णा अभिमत विद्यापीठाच्या पदवीदान समारंभासाठी केंद्रीय मंत्री गडकरी आले होते. सकाळी साडेनऊ वाजता कऱ्हाड विमानतळावर त्यांचे आगमन झाले. त्यावेळी भाजपच्या इतर नेत्यांबरोबरच ज्येष्ठ नेते राजाभाऊ देशपांडे यांनीही त्यांचे स्वागत केले. त्यानंतर गडकरी कार्यक्रमस्थळी रवाना झाले. तर राजाभाऊ देशपांडे त्यांच्या कामानिमित्त कोळे येथे निघून गेले.
दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास गडकरी यांचा नियोजित कार्यक्रम संपला. आता ते विमानतळावरून सोलापूरला रवाना होणार होते. त्यामुळे पोलिस बंदोबस्त तसा लागला. मात्र, गाडीत बसल्यावर त्यांनी राजाभाऊ देशपांडे यांच्या घरी जायचे असल्याचे सांगितले. त्यामुळे प्रशासनाची धावपळ उडाली. गाड्यांचा ताफा देशपांडे यांच्या घरी पोहोचला. नीतिश देशपांडे, शांता देशपांडे यांनी त्यांची स्वागत केले. चहापान घेऊन गडकरींनी देशपांडे परिवाराचा निरोप घेतला. मात्र, गडकरींच्या सदिच्छा भेटीने देशपांडे परिवाराच्या चेहऱ्यावरून आनंद ओसंडून वाहत होता.
दरम्यान, विमानतळावर उंडाळकरांनी गडकरींची भेट घेतली. २४ कोटींच्या निधींच्या मंजुरीची मागणी त्यांनी केली. या मागणीचा गांभीर्याने विचार करत केंद्रीय मंत्री गडकरी यांनी तातडीने निधी देण्याचे आश्वासन दिले. कऱ्हाड दक्षिण मतदारसंघातील पुणे-बंगलोर महामार्ग-पाचवडेश्वर कोडोली-दुशेरे ते शेणोली स्टेशन या प्रमुख जिल्हा मार्ग क्रमांक ६५ वरील पुलासाठीचा प्रस्ताव केंद्रीय मार्ग निधी योजना २०१५ अंतर्गत सार्वजनिक बांधकाम मंडल, सातारा यांच्याकडून पाठविण्यात आला होता. (प्रतिनिधी)