‘कऱ्हाड दक्षिण’साठी गडकरी-भोसले चर्चा
By admin | Published: March 29, 2016 10:10 PM2016-03-29T22:10:54+5:302016-03-30T00:11:54+5:30
निधीची मागणी : महत्त्वाकांक्षी कामांची यादीकडे लक्ष वेधले; विकासासाठी घातले साकडे
कऱ्हाड : कराड दक्षिण मतदारसंघातील कऱ्हाड शहरासाठी नवीन बायपास रस्ता तसेच संगम हॉटेलसमोरील उड्डाणपूल व राष्ट्रीय महामार्गावरील मालखेड येथील कृष्णा नदीवरील पुलासह वाठार, रेठरे बुद्रुक ते शेणोली स्टेशन, तासगाव जोडणाऱ्या दुभाजकासह रस्ता यासारख्या महत्त्वाकांक्षी विकासकामांच्या निधीला मंजुरी द्यावी, अशी मागणी भाजपचे प्रदेश चिटणीस डॉ. अतुल भोसले यांनी केंद्रीय रस्तेवाहतूक व जहाजमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे.
कऱ्हाड येथे कृष्णा अभिमत विद्यापीठाच्या पदवीदान समारंभासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आले होते. प्रारंभी विमानतळावर डॉ. अतुल भोसले यांनी भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांसोबत गडकरी यांचे स्वागत केले.
यावेळी डॉ. अतुल भोसले यांनी दक्षिणच्या विकासासाठी महत्त्वाची असणारी विकासकामे व त्यासाठी लागणाऱ्या निधीसाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे निवेदन सादर केले.
यामध्ये राष्ट्रीय महामार्गावर गोटे ते कऱ्हाडातील सात शहीद चौक हा रस्ता, कृष्णा नदीवरील पुलासह तयार करून मजबुतीकरण व डांबरीकरण तसेच राज्य मार्ग क्र. १४४ कऱ्हाड-मलकापूर नांदलापूर, येणपे, कोकरूड हा २७ कि.मी. रस्ता, राज्य मार्ग क्र. १४८ मधील नवजा-हेळवाक, मोरगिरी, साजूर, तांबवे, विंग, वाठार, रेठरे बुद्रुक, शेणोली स्टेशन हर १०५ कि. मी. पैकी राष्ट्रीय महामार्ग क्र. ४ वाठार ते शेणोली स्टेशनपर्यंत दुभाजकासह मजबुतीकरण व डांबरीकरण, ७.५ कि. मी. रस्ता, उंब्रज, इंदोली ते पाल १३ कि.मी. रस्ता, कालवडे, बेलवडे बद्र्रुक, कासारशिरंबे, साळशिरंबे १५ कि. मी. रस्ता, पाचवडेश्वर ते कोडोली, कृष्णा नदीवरील पूल बांधकामांसह दुशेरे ते शेरे ते शेणोली स्टेशनपर्यंत १७ कि. मी. रस्ता, कऱ्हाड-कापील, कोडोलीपर्यंतचा ४ कि. मी. रस्ता, नारायणवाडी ते कालेटेक, काले, कालवडे, नांदगाव, साळशिरंबे, पाचुंब्रीपर्यंतचा २७ कि. मी. रस्ता, कार्वे, कोडोली, शेरे गोंदी ते रेठरे बुद्रुक १६ कि. मी.रस्ता, वहागाव, घोणशी ते कोपर्डे हवेली, पार्ले बनवडी ८.५ कि. मी. रस्ता, येणके, आणे, कोळे पर्यंतचा ६ कि. मी. रस्ता, उंडाळे, शेवाळेवाडी, पाटीलवाडी ते रयत कारखाना, येळगाव, शेवाळेवाडी ते येणपे गिरजवाडी १४ कि. मी. रस्ता, आटके, नारायणवाडी ते कालेटेक, कालवडे, नांदगाव, साळशिरंबे, पाचुंब्री रस्त्यास निधी मिळणेबाबतचे निवेदन केंद्रीय रस्तेविकास मंत्री नितीन गडकरी यांना देण्यात आले. यावेळी गडकरी यांनी कराड दक्षिणमधील विकासकामांसाठी लागणाऱ्या निधीसंदर्भात सकारात्मक निर्णय घेणार असल्याची ग्वाही डॉ. भोसले यांना दिली.(प्रतिनिधी)