गड-किल्ले संवर्धनासाठी दुर्ग प्राधिकरण, शिवप्रताप दिन सोहळ्यात मुख्यमंत्र्यांनी केली घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2022 01:40 PM2022-12-01T13:40:08+5:302022-12-01T13:57:06+5:30

शिवरायांच्या जयजयकाराच्या घोषणांनी किल्ले प्रतापगडावरील वातावरण शिवमय बनले

Gadkot, Fort Authority for Fort Conservation, The announcement was made by the Chief Minister during the Shiv Pratap Day celebrations | गड-किल्ले संवर्धनासाठी दुर्ग प्राधिकरण, शिवप्रताप दिन सोहळ्यात मुख्यमंत्र्यांनी केली घोषणा

गड-किल्ले संवर्धनासाठी दुर्ग प्राधिकरण, शिवप्रताप दिन सोहळ्यात मुख्यमंत्र्यांनी केली घोषणा

Next

महाबळेश्वर : ‘शिवकालीन धाडशी खेळांचा थरार, विविध सांस्कृतिक कार्यक्रम, शिवाजी महाराजांचा जयजयकार अशा स्फूर्तिदायक वातावरणात आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत किल्ले प्रतापगडावर शिवप्रताप दिन अभूतपूर्व उत्साहात साजरा करण्यात आला. तर याच कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गडकोट आणि किल्ले संवर्धनासाठी दुर्ग प्राधिकरण स्थापन करण्यात येईल, अशी घोषणाही केली.

महाबळेश्वर तालुक्यातील किल्ले प्रतापगडावर बुधवारी शिवप्रताप दिन उत्साहात साजरा झाला. या कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रतापगड येथील बुरुजावरील शिवशाहीचे प्रतीक असलेला भगवा फडकविण्यात आला. त्यानंतर भवानीमातेची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आरती केली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी 'क्षत्रिय कुलावतंस, राजाधिराज..., अशा शिवरायांच्या जयजयकाराच्या घोषणांनी वातावरण भारून गेले होते.

पोलिस दलाच्या बँड पथकाने विविध धून वाजवून मानवंदना दिली. यानंतर प्रतापगडावर छत्रपतींच्या अश्वारुढ पुतळ्यावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवर्षाव करण्यात आला. यावेळी पालकमंत्री शंभूराज देसाई, पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा, खासदार श्रीनिवास पाटील, रणजितसिंह नाईक-निंबाळकर, माजी मंत्री महादेव जानकर, आमदार भरत गोगावले, शिवेंद्रसिंहराजे भोसले, मकरंद पाटील, महेश शिंदे, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक मनोजकुमार लोहिया, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, पोलिस अधीक्षक समीर शेख, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री शिंदे यांनी शिवाजी महाराजांनी उभारलेले गडकोट किल्ले आजही प्रेरणा देणारे स्रोत आहेत. किल्ल्यांची बांधणी, पाण्याचा साठा, प्रवेशद्वार स्थापत्य ही कलेची उत्तम उदाहरणे आहेत. आज किल्ले प्रतापगडावर ३६३ वा शिवप्रताप दिन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. किल्ले प्रतापगडाच्या संवर्धनाचा १०० कोटींचा आराखडा सादर केला आहे. या आराखड्यानुसार २५ कोटींचा निधी तत्काळ दिला जाईल, असे स्पष्ट केले.

शिवप्रतापदिनाला महत्त्व असल्याचे सांगून पालकमंत्री देसाई म्हणाले, ‘किल्ले प्रतापगडाच्या संवर्धन आराखड्यास निधी मिळाल्यास संवर्धनाचे काम वेळेत पूर्ण होईल. डोंगरी विभागाचे प्रश्न, पुनर्वसनाचे प्रश्न व भूकंपग्रस्तांना दाखले यासह अन्य प्रश्न तत्काळ राज्य शासन सोडवत आहे. जिल्ह्याच्या विकासासाठी सर्व लोकप्रतिनिधींनी एकत्र यावे.’

‘किल्ले प्रतापगड परिसरात अफजलखानाच्या वधाचे शिल्प उभारण्यात येऊन त्याचे लोकार्पण मोठ्या उत्साहात करण्यात येईल, असे पर्यटनमंत्री लोढा यांनी यावेळी सांगितले.

प्रतापगडावर ऐतिहासिक खेळामुळे शिवकाळ...

शिवप्रताप दिनानिमित्त ऐतिहासिक खेळात तल्लख असलेल्या विद्यार्थ्यांनी लाठी चालवणे, तलवारबाजी, दांडपट्टा, कुऱ्हाडबाजी आदी ऐतिहासिक खेळांचे प्रात्यक्षिके सादर करून उपस्थितांची मने जिंकली. यावेळी शाहिरांनी प्रतापगडचा रणसंग्राम हा जोशपूर्ण पोवाडा सादर केला. या नेत्रदीपक सोहळ्यास शासकीय अधिकारी, शिवप्रेमी नागरिक आणि विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: Gadkot, Fort Authority for Fort Conservation, The announcement was made by the Chief Minister during the Shiv Pratap Day celebrations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.