दिव्यांगावर मात करून शिक्षण क्षेत्रात गगनभरारी सर्वसामान्य शिक्षक ते केंद्रप्रमुख : खटाव तालुक्यातील सुरेखा पवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2018 11:58 PM2018-03-07T23:58:13+5:302018-03-07T23:58:13+5:30
नम्रता भोसले ।
खटाव : लहानपणापासूनच दिव्यांग असूनही जिद्द व चिकाटीच्या जोरावर सुरेखा पवार यांनी अनेक संकटांवर मात करीत आपले ध्येय साध्य केले आहे. आपण दिव्यांग आहोत ही भावना मनात न ठेवता त्यांनी आज शिक्षण क्षेत्रात एक सर्वसामान्य शिक्षक ते केंद्रप्रमुख, असा प्रवास यशस्वी पार केला आहे.
सुरेखा पवार यांचे प्राथमिक शिक्षण फलटण येथे झाले. वयाच्या अवघ्या दुसºयाच वर्षी त्यांना पोलिओमुळे अपंगत्व आले. त्यानंतर एका किरकोळ अपघातात पुन्हा एकदा त्या पायावर इजा झाल्याने त्यांना गंभीर अपंगत्वास सामोरे जावे लागले; परंतु अत्यंत हुशार व चाणाक्ष असल्यामुळे तसेच शिक्षणाची आवड असल्यामुळे त्यांनी पदवीपर्यंतचे शिक्षण तर पूर्ण केलेच त्याचबरोबर त्या पदवीधरही झाल्या.
आपल्या शिक्षणाच्या जोरावर १३ जानेवारी १९८४ रोजी त्या प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून रुजू झाल्या. २८ वर्षे अविरत ज्ञानार्जनाचे कार्य करत असताना मुख्याध्यापकपदाची जबाबदारीही त्यांनी स्वीकारली.
या काळात शासनाच्या वतीने दिल्या जाणाºया व राबवण्यात येणाºया प्रत्येक कार्यात त्यांचा सहभागही तितकाच उल्लेखनीय ठरला. कारण कोणतीही दिली गेलेली जबाबदारी त्या मी अपंग आहे, ही सबब न सांगता सर्वांच्या आधी पार पाडत असत. त्यामुळे अधिकारी वर्गही त्यांच्या या कामाच्या हातोटीमुळे समाधानी असायचा.
त्यांनी आपल्या अध्यापनातून तसेच आपल्या कार्यातून २८ वर्षे शिक्षक पदावर असताना चोखपणे शिकवण्याचे काम करत अनेक विद्यार्थीही तितकेच सक्षमपणे घडवले. जे आज मोठ्या पदावर कार्यरत आहेत. २०१३ रोजी त्यांच्या कामाची दखल घेत त्यांना केंद्रप्रमुख म्हणून बढती मिळाली. वारंवार शिक्षक बैठका असो, शिक्षणात होत असलेले नवीन बदल. सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करत त्याची अंमलबजावणी करण्यासाठी नेहमी तत्पर असणाºया तसेच वेळेचे बंधन व नियमित काम करण्याची आवड यामुळे सुरेखा पवार यांनी यांनी वेगळा ठसा निर्माण केला आहे. जीवनाच्या या वाटेवर चालत असताना त्यांना खडतर असा प्रवासही करावा लागला आहे. परंतु समोर येईल त्या परिस्थितीवर धैर्याने तोंड देत तसेच आल्या अपंगत्वावर कोणीतरी आपल्याला सवलत द्यावी किंवा कामाच्या बाबतीत सूट द्यावी, अशी त्यांनी याचनाही कधी केली नाही. गेल्या ३४ वर्षांपासून सुरेखा पवार यांनी यशस्वी प्रवास सुरू ठेवला आहे.
शिक्षण क्षेत्रात गौरवास्पद काम..
सुरेखा पवार यांचे पती विजय पवार हे शेतकरी आहेत. आपल्या दोन मुलांना जिल्हा परिषद शाळेमधूनच शिक्षण देऊन त्यांना उच्च पदस्थ अधिकारी बनविण्यात त्या यशस्वी झाल्या आहेत. त्यांचा मुलगा विश्वल पवार हा फ्लाईट लेफ्टनंट पदावर कार्यरत आहे. तर मुलगी प्रियांका बी. फार्मसी होऊन सध्या नोकरी करत आहे. आपल्या दिव्यांगत्वावर मात करीत सुरेखा पवार यांनी शिक्षण क्षेत्रात गौरवास्पद व अभिमानास्पद क ाम केल्याबद्दल त्यांचा नुकताच शिक्षण क्षेत्रातील ‘यशवंत पुरस्कार’ देऊन गौरव करण्यात आला आहे.
मला दिव्यांग असल्याने मी कोणत्याही कामात अग्रेसर राहू शकणार नाही, अशीच धारणा असायची; परंतु माझ्या कामातून मला सर्व वरिष्ठांकडून तसेच सहकारी मंडळींकडून माझ्या कोणत्याही कामासाठी कौतुकास्पद उद्गार निघायचे, हीच माझ्या दृष्टीने सर्वात मोठी बाब असायची. याच प्रेरणादायी प्रत्येक गोष्टी माझ्या आयुष्यात सतत मला कामासाठी प्रोत्साहित करत आहेत.
- सुरेखा पवार, केंद्रप्रमुख