दीड कोटींचा ‘गजेंद्र’ पितो दररोज पंधरा लीटर दूध!, साताऱ्यातील छत्रपती कृषी प्रदर्शनात ठरला आकर्षणाचे केंद्र
By सचिन काकडे | Published: October 20, 2023 11:48 AM2023-10-20T11:48:50+5:302023-10-20T11:49:35+5:30
सातारा : साताऱ्यातील जिल्हा परिषद मैदानावर सुरू असलेल्या छत्रपती कृषी, वाहन व औद्योगिक प्रदर्शनात कर्नाटक येथून आलेला दीड कोटी ...
सातारा : साताऱ्यातील जिल्हा परिषद मैदानावर सुरू असलेल्या छत्रपती कृषी, वाहन व औद्योगिक प्रदर्शनात कर्नाटक येथून आलेला दीड कोटी रुपयांचा व एक टन वजनाचा गजेंद्र रेडा सर्वांच्याच आकर्षणाचा केंद्र ठरला आहे. हा रेडा पाहण्यासाठी जिल्ह्याभरातून नागरिक प्रदर्शनाला भेट देऊ लागले आहेत.
स्मार्ट एक्स्पो ग्रुपच्या व्यवस्थापनाअंतर्गत व खासदार उदयनराजे भोसले मित्र समूहाच्या वतीने या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवारी खासदार उदयनराजे भोसले यांच्या उपस्थितीत या प्रदर्शनाचा शुभारंभ करण्यात आला. कृषी औजारे, खते, औषधे, औषध फवारणी करणारा ड्रोन, वाहने या प्रदर्शनाचे वैशिष्ट्य असले तरी प्रदर्शनात सहभागी झालेला एक टन वजनाचा महाकाय गजेंद्र रेडा कुतूहलाचा विषय ठरला आहे.
बेळगाव जिल्ह्यातील कागवाड तालुक्यातील मंगसुळी येथून हा रेडा प्रदर्शनात सहभागी झाला आहे. या रेड्याचे मालक विलास गणपती नाईक यांनी सांगितले, महाराष्ट्र, कर्नाटक राज्यातील वीसहून अधिक प्रदर्शनात गजेंद्रने सहभाग घेतला आहे. गजेंद्र हिंदकेसरी पुरस्काराने सन्मानित झालेला आहे. दररोज पंधरा लीटर दूध, चार किलो पेंड, तीन किलो गव्हाचा आटा, तीन किलो सफरचंद, ऊस, वैरण, उसाचे वाड, पाचट असा त्याचा दररोजचा खुराक आहे. या रेड्याचे खाद्य व त्याच्या आरोग्याची पुरेपूर काळजी घेतली जाते.
हा धष्टपुष्ट रेडा प्रदर्शनातील कुतूहल ठरला असून, त्याला पाहण्यासाठी अबालवृद्धांची गर्दी होत आहे. अनेक नागरिक या महाकाय रेड्याला आपल्या कॅमेऱ्यात कैद करत आहेत.
श्वानांनी वेधले लक्ष..
कृषी प्रदर्शनात शुक्रवारी श्वानांच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेसाठी पिटबूल, ग्रे हाऊंड, सायबेरियन हस्की, जर्मन शेफर्ड, लॅब, रॉट, पोमेनेरियन, विलर आदी विविध जातींचे श्वान सहभागी झाले होते. या श्वानांनी नागरिकांचे लक्ष वेधून घेतले.