जुगार अड्ड्यावर अलिशान कार अन् सात तोळे सोने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2019 04:13 PM2019-06-10T16:13:07+5:302019-06-10T16:14:01+5:30
आत्तापर्यंत जुगार अड्ड्यावर पोलिसांना जुगाराचे साहित्य आणि पैसे सापडत होते. मात्र, पानमळेवाडी, ता. सातारा येथे जुगार अड्ड्यावर पोलिसांना अलिशान कार आणि तब्बल सात तोळ्यांचे दागिने सापडले आहेत. याप्रकरणी सातारा तालुका पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.
सातारा : आत्तापर्यंत जुगार अड्ड्यावर पोलिसांना जुगाराचे साहित्य आणि पैसे सापडत होते. मात्र, पानमळेवाडी, ता. सातारा येथे जुगार अड्ड्यावर पोलिसांना अलिशान कार आणि तब्बल सात तोळ्यांचे दागिने सापडले आहेत. याप्रकरणी सातारा तालुका पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.
कादर बशीर पठाण (वय ३३) इम्रान बशीर पठाण (वय ३४), मोहसीन बशीर पठाण (वय २५, रा. पानमळेवाडी, ता. सातारा) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी, पानमळेवाडीतील एका दुमजली इमारतीमध्ये जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तेथे छापा टाकला असता पोलीस आवाक झाले. सोन्याची सात तोळ्याची चेन, एक चांदीचे ब्रेसलेट, एलईडी टीव्ही, स्पीकर, पॉवरबँक, तीन महागडे मोबाईल असा ऐवज जुगार अड्ड्यावर सापडला. तर एक अलिशान कार इमारतीखाली पार्क केलेली आढळून आली. ही कारही पोलिसांनी जप्त केली.
या जुगार अड्ड्यावर तब्बल १७ लाख ३३ हजार ४२२ रुपयांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला. एवढ्या मोठ्या प्रमाणात कारवाईची बहुदा ही पहिलीच घटना आहे.
ही कारवाई सहायक पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र यादव, पोलीस कॉन्स्टेबल ओंकार यादव, मोहन पवार, प्रमोद भिसे, मंगेश डोंबे, प्रतिभा करपे, दादा बनकर यांनी केली.