गद्दारी केली म्हणून साथीदाराकडूनच गेम

By Admin | Published: February 12, 2017 10:28 PM2017-02-12T22:28:59+5:302017-02-12T22:28:59+5:30

गुंड अभिजीत खून प्रकरण : राऊतवाडीतील एकास अटक; मद्यप्राशनानंतर केले कोयत्याने वार

Game from a partner as the betrayer did | गद्दारी केली म्हणून साथीदाराकडूनच गेम

गद्दारी केली म्हणून साथीदाराकडूनच गेम

googlenewsNext



कऱ्हाड : साताऱ्यातील तडीपार गुंडाच्या खुनात पोलिसांनी त्याच्याच एका साथीदाराला ताब्यात घेऊन अटक केली आहे. गुन्ह्यातील सहभागाची पोलिसांना माहिती देऊन तुरुंगात अडकवलं व चोरीच्या मुद्देमालात योग्य वाटणी दिली नाही, या कारणावरून आपण हा ‘गेम’ केल्याची कबुली त्याने पोलिसांना दिली आहे. साताऱ्याच्या स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या काही तासांत या खुनाचा उलगडा करून आरोपीला गजाआड केले.
अमोल बाबूराव पोळ (वय २८, रा. राऊतवाडी, ता. कोरेगाव) असे पोलिसांनी अटक केलेल्याचे नाव आहे. शहरानजीक बनवडी येथे अभिजित ऊर्फ नान्या तुळशीदास पवार (वय ३५, मूळ रा. लिंब, ता. सातारा) याचा शुक्रवारी रात्री धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आला होता. अभिजित ऊर्फ नान्या हा सातारा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार होता. त्याच्यावर चोरी, जबरी चोरी, घरफोडी, दरोड्याची तयारी असून, तब्बल ४७ गुन्हे नोंद होते. काही दिवसांपूर्वीच त्याला साताऱ्यातून तडीपार करण्यात आले होते. तडीपार केल्यानंतर तो कऱ्हाडनजीक बनवडी येथील जलविहार कॉलनीत वास्तव्यास आला. त्याठिकाणी त्याने एक फ्लॅट भाडेतत्त्वावर घेतला. राहण्यास आल्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्याने दारूच्या नशेत पत्नीला मारहाण केल्यामुळे पत्नी माहेरी निघून गेली. त्यामुळे नान्या एकटाच त्या फ्लॅटमध्ये वास्तव्य करीत होता. दरम्यान, शनिवारी दुपारी इमारतीचा सुरक्षारक्षक आधारकार्डची झेरॉक्स आणण्यासाठी गेला असताना नान्याचा खून झाल्याचे उघडकीस आले.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिस उपअधीक्षक राजलक्ष्मी शिवणकर, निरीक्षक प्रमोद जाधव, स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक रमेश गर्जे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी त्याठिकाणी दाखल झाले. अभिजित ऊर्फ नान्या हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याने त्याचा दुसऱ्या एखाद्या गुन्हेगाराने खून केल्याची शक्यता होती. त्यानुसार पोलिसांनी तपास सुरू केला. त्यातच नान्याचा साथीदार अमोल पोळ याची माहिती पोलिसांना मिळाली. अमोल पोळ व नान्या या दोघांनी एकत्रितपणे दहापेक्षा जास्त गुन्हे केले आहेत. त्यामुळे पोलिसांचा पोळवरील संशय बळावला. गुन्हे शाखेचे सहायक निरीक्षक रमेश गर्जे व त्यांच्या पथकाने तातडीने पोळचा शोध सुरू केला. शनिवारी रात्रीच त्याला साताऱ्यातून ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर त्याला कऱ्हाड शहर पोलिस ठाण्यात आणून त्याच्याकडे कसून चौकशी करण्यात आली. त्यावेळी त्याने या गुन्ह्याची कबुली दिली.
नान्या व अमोल पोळने यापूर्वी जे गुन्हे केले होते, त्या गुन्ह्यात चोरून आणलेल्या ऐवजातील योग्य वाटणी नान्याने अमोलला दिली नव्हती. या गद्दारीमुळे त्याचा त्याच्यावर राग होता. तसेच यापूर्वी एका चोरीच्या गुन्ह्यात नान्याला अटक झाली होती. त्यावेळी पोलिस तपासात नान्याने अमोलचे नाव घेतले. त्यामुळे अमोललाही अटक झाली. नान्यामुळेच आपल्याला तुरुंगात जावे लागले. तसेच त्याने जामिनासाठीही आपल्याला मदत केली नाही, याचाही राग अमोलच्या डोक्यात होता. याच रागातून त्याने शुक्रवारी रात्री शस्त्राने वार करून नान्याचा खून केल्याची माहिती पोलिस तपासात उघड झाली आहे. स्थानिक गुन्हे शाखेने आरोपी अमोल पोळ याला कऱ्हाड शहर पोलिसांच्या ताब्यात दिली असून, कऱ्हाड पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

Web Title: Game from a partner as the betrayer did

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.