खेळ असा रंगला गं, खेळणारा दंगला!
By admin | Published: October 18, 2015 10:46 PM2015-10-18T22:46:34+5:302015-10-18T23:33:43+5:30
पारंपरिक पोशाखात नृत्य : ‘राजधानी रास दांडिया’त नातीपासून आजीपर्यंत सर्वांनीच धरला ठेका-- लोकमत माध्यम प्रायोजक
सातारा : आवरून सावरून असलेल्या महिलांचा जत्था.. सर्वोत्कृष्ठ ठरण्याची तयारी, थिरकायला लावणारे संगीत आणि प्रोत्साहन द्यायला उपस्थित महिलांची गर्दी... अशा वातावरणात शनिवारी ‘राजधानी रास दांडिया रंगला’ चार वर्षांपासून तब्बल ६० वर्षांच्या आजीपर्यंत सर्वांनीच दांडियाचा मनसोक्त आनंद घेतला.
येथील अनंत इंग्लिश स्कूलमध्ये शनिवारपासून ‘राजधानी रास दांडिया’चे आयोजन करण्यात आले आहे. ‘लोकमत’ या कार्यक्रमाचे माध्यम प्रायोजक आहे. मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन झाल्यानंतर उपस्थित महिलांनी सुमारे दहा मिनिटे विविध गाण्यांवर मनसोक्त नृत्य करण्याचा आनंद घेतला. त्यानंतर गोल करून महिलांनी उडत्या चालीवरील गाण्यावर ‘रास दांडिया’ खेळला. ‘साडी की फॉल से, नगारे संग ढोल बाजे, धतिंग डान्स, दिल्ली वाली गर्लफ्रेंड, नागीन डान्स चायना, सेल्फी ले ले... कुडी सॅटरडे ’ या सारख्या अनेक उडत्या चालींच्या गाण्यावर महिलांनी लयबद्ध नृत्य सादर केले.
नवरात्रोत्सवात युवतींना दांडियासाठी बाहेर पाठवताना अनेक पालक चिंतातुर असतात; मात्र येथे हे चित्र पाहायला मिळाले नाही. रोज एकीला ‘दांडिया क्विन आॅफ द डे’ म्हणून निवडण्यात येणार आहे. तीन दिवसांच्या क्विनमधून चौथ्या दिवशी ‘राजधानी क्विन’साठी सामना रंगणार आहे. चार दिवसांची उपस्थिती बंधनकारक आहे. दररोज एका भाग्यवान विजेतीला बक्षिस आहे. राजधानी क्विनला पुढील वर्षी मानाचे स्थान, समितीमध्येही सहभागी करुन घेतले जाणार आहे. (प्रतिनिधी)
अपघात विमा
या ‘रास दांडिया’साठी उपस्थित असणाऱ्या कोणाचाही अपघाती मृत्यू झाला तर त्यांच्यासाठी दोन लाखांचा अपघात विमा उतरविण्यात आला असल्याची माहिती मुख्य संयोजक सिद्धी पवार यांनी दिली.
‘नो मॅन झोन
रास दांडिया’ खास महिलांसाठी असल्यामुळे येथे ‘नो मॅन झोन’ दिसत होते. बोटावर मोजता येतील एवढेच पुरुष लांब कुठेतरी घरातील चिमुकल्यांना खेळवत असल्याचे चित्र दिसत होते. तर आई-ताई बरोबर नृत्य बघायला आलेली अनेक लहान मुलं स्वत:चा गट करून खेळत बसले होते.