मुलांच्या जीवाशी ‘खेळ’; ज्येष्ठांना ‘धोका’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2018 12:34 AM2018-04-25T00:34:50+5:302018-04-25T00:34:50+5:30
कºहाड : मुलांना छान छान नवीन खेळणी आणि नागरिकांसाठी आकर्षक ओपन जिमचे साहित्य उपलब्ध झाले तर कोणाला आनंद होणार नाही. होय कºहाडकरांनाही असा आनंद झाला. शहरातील बागांमधील नवी खेळणी लहान मुलांना तर ओपन जिमचं साहित्य ज्येष्ठांना आकर्षित करू लागलं; पण त्यांचा आनंद फार काळ टिकला नाही. कारण आठवडाभरातच या बागांतील नवीन खेळणी अन् ओपन जिमचं साहित्य यांची अवस्था दयनीय झाली आहे.
लहान मुले व ज्येष्ठांच्या जीवाला धोका होईल, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. याकडे लक्ष द्यायला पालिकेला वेळ आहे का? असा सवाल कºहाडकरांच्यातून होत आहे. विशेष म्हणजे मोडकळीस पडलेल्या ओपन जिमच्या साहित्याचा व खेळण्याचा पालिकेच्या हस्ते लोकार्पण सोहळा पार पडणार आहे.
कºहाड पालिकेच्या माध्यमातून सुमारे चाळीस लाख रुपये निधी खर्च करून शहरातील पी. डी. पाटील, प्रीतिसंगम बाग, शिवाजी हौसिंग सोसायटीतील उद्यान या ठिकाणी ओपन जिमचे साहित्य बसविण्यात आले. तर लहान मुलांसाठी पी. डी. पाटील उद्यान व प्रीतिसंगम बागेत खेळण्याची साहित्य बसविले आहे. मात्र, खेळण्याचे साहित्य व जिमचे साहित्य योग्य प्रकारे बसविण्यात आले नसल्याचे दिसून आले आहे. पी. डी. पाटील उद्यानातील जिमच्या साहित्यांपैकी काहींचे नटबोल्ट निघाले आहेत. तर काही साहित्ये तात्पुरता खडी व काँक्रीटचा भराव टाकून बसविलेली आहेत.
व्यायाम करताना साहित्यातील एखादे नटबोल्ट निघाल्यास दुर्घटनाही घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर लहान मुलांना खेळण्यासाठी बसविण्यात आलेल्या साहित्यांमध्ये घसरगुंडी तर अधांतरीच ठेवण्यात आली आहे. मुलांचा त्यावरून तोल गेल्यास मुले खाली पडून दुखापत होण्याची शक्यता आहे.
तर प्रीतिसंगम बागेतील खेळण्यांची व जीमच्या साहित्याची ही अशीच अवस्था आहे. आरोग्याची सोय करण्याच्या नावाखाली सर्वसामान्य नागरिकांच्या जीवाशी धोका तर चिमुकल्यांच्या जीवाचा खेळ सुरू झाला असल्याचे या ठिकाणी पाहावयास मिळत आहे.
अशा अवस्थेत साहित्य व खेळण्याची दुरुस्ती करण्याऐवजी पालिकेकडून याचे थाटामाटात लोकार्पण केले जाणार आहे, हे विशेष.
जुन्या मोडलेल्या साहित्यावर मुलांचा जीवाशी खेळ
शहरातील प्रीतिसंगम बागेतील काही मोडतोड झालेली खेळणी ही सध्या चिमुकल्यांच्या जीवावर बेतत आहेत. परिणामी, उद्यान असूनसुद्धा त्यामध्ये खेळणाऱ्या चिमुकल्यांना आनंद मिळेनासा झाला आहे. खेळण्यासाठी आलेल्या चिमुकल्यांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचे चित्र जणू येथील दिवंगत यशवंतराव चव्हाण स्मृतिस्थळावरील बागेत पाहायला मिळत आहे.
जिमच्या साहित्याला काँक्रीटचा भराव
कºहाड पालिकेच्या वतीने पी. डी. पाटील उद्यान परिसरातील लोकार्पण करण्यात येत असलेल्या ओपन जिम व लहान मुलांच्या खेळण्याचे साहित्य बसविण्यात आले आहे. मात्र, त्यास तात्पुरता मुरूम व काँक्रीटचा भराव टाकण्यात आला आहे. या भरावामुळे जिमचे साहित्य हलत आहे. तर काही साहित्य मोडलेले आहे. याबाबत नाराजी व्यक्त केली जात आहे.