जाधववाडी ग्रामपंचायतीकडून ग्रामस्थांच्या आरोग्याशी खेळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2017 02:47 PM2017-10-25T14:47:01+5:302017-10-25T14:55:11+5:30
फलटण शहरात डेंग्यू, चिकुण गुनियासारख्या आजाराने धुमाकूळ घातला असताना शहरालगत जाधववाडी येथील ग्रामपंचायत वाहती गटारे बंदिस्त करण्याची योजना मंजूर असूनही याचे काम प्रलंबित ठेवून ग्रामस्थांच्या आरोग्याशी खेळत असल्याने ग्रामस्थांमधून तीव्र संतापाची भावना व्यक्त होत आहे.
फलटण ,दि. २५ : शहरात डेंग्यू, चिकुण गुनियासारख्या आजाराने धुमाकूळ घातला असताना शहरालगत जाधववाडी येथील ग्रामपंचायत वाहती गटारे बंदिस्त करण्याची योजना मंजूर असूनही याचे काम प्रलंबित ठेवून ग्रामस्थांच्या आरोग्याशी खेळत असल्याने ग्रामस्थांमधून तीव्र संतापाची भावना व्यक्त होत आहे.
जाधववाडी ग्रामपंचायत हद्दीतील बिरदेवनगर व अन्नपूर्णा मंदिर येथील गटाराच्या कामाच्या निविदा २०१६ मध्ये मंजूर करण्यात आल्या असूनही अद्यापपर्यंत या कामाचे कार्यादेश देण्यात आले नसल्याने प्रभाग क्रमांक १ व ४ मधील वाहती गटारे आरोग्यदृष्ट्या धोकादायक बनली आहे
फलटण पंचायत समिती गटविकास अधिकाऱ्यानी याबाबत ग्रामसेवकांना योग्य आदेश देऊन ही कामे तातडीने सुरू करावीत आणि गटारांचे तुंबलेले पाणी व त्याभोवती वाढलेली झुडपे त्यातून ग्रामस्थांच्या आरोग्याला निर्माण झालेला धोका त्वरित दूर करावा, अशी मागणी ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी केली आहे.
ग्रामस्थांनी यापूवीर्ही गटविकास अधिकाऱ्यांकडे सुमारे तीन वर्षांपासून लेखी व तोंडी तक्रारी करून येथील रहिवाशांच्या घरातील सांडपाणी गटारे नसल्याने रस्त्यावर येत असून, ते रिकाम्या प्लॉटवर किंवा अन्य खुल्या जागेवर, घराच्या भिंतीलगत साठून राहत असल्याने त्यातून दुर्गंधी बरोबरच आरोग्याला धोका निर्माण होणारी परिस्थिती उद्भवली असून, यापूर्वी या भागातील गटारांसाठी ई टेंडरद्वारे टेंडर्स मागवून १७ लाख रुपयांची कामे करण्याचे नियोजन केले आहे. मात्र प्रत्यक्षात या कामाचे आदेश (वर्क आॅर्डर) संबंधित ठेकेदारांना दिली गेली नसल्याने काम सुरूच झाले नाही.
दरम्यान, गेल्या महिन्यात झालेल्या प्रचंड पावसामुळे गटाराच्या साठलेल्या पाण्यात भर पडली असून, त्याभोवती मोठ्या प्रमाणात वनस्पती उगवली आहे. तसेच ही सर्व साठलेल्या पाण्याच्या ठिकाणे जंतूनिर्मितीची केंद्रे बनली असून, ग्रामस्थांनी आता याबाबत कोणाकडे दाद मागावी, याबाबत संभ्रमावस्था निर्माण झाली असल्याने पंचायत समिती, गटविकास अधिकाऱ्यांनी याबाबत ठोस भूमिका घ्यावी, अन्यथा येथील ग्रामस्थांंना पंचायत समितीवर मोर्चा काढून मागणी सर्वांसमोर ठेवावी लागणार आहे.
आरोग्याचा प्रश्न तातडीने मार्गी लावा..
गतवर्षी मार्च महिन्यात कर वसुलीच्यावेळी ग्रामस्थांनी गटारे झाल्याशिवाय कर भरण्यास नकार दिल्यानंतर ग्रामपंचायत पदाधिकारी आणि ग्रामसेवकांनी काम मंजूर झाले असून, तातडीने गटारे बांधण्यात येणार असल्याचे सांगून करवसुली करून घेतली. मात्र त्यानंतर या प्रश्नाकडे दुर्लक्ष करून ग्रामस्थांच्या आरोग्याशी खेळण्याचा प्रयत्न ग्रामपंचायत करीत असल्याने ग्रामस्थांमधून तीव्र संतापाची भावना व्यक्त होत आहे. सातारा जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी या प्रश्नात लक्ष घालून जाधववाडी ग्रामस्थांच्या आरोग्याचा हा प्रश्न तातडीने मार्गी लावावा, अशी मागणी होत आहे.