वेदांतिकाराजेंची ‘गांधीगिरी’
By admin | Published: January 29, 2015 09:10 PM2015-01-29T21:10:24+5:302015-01-29T23:37:40+5:30
गळतीसंदर्भात नागरिक आक्रमक : बसकण मारून शाहूनगरवासीयांनी दिले गुलाबपुष्प
सातारा : शाहूनगर परिसरात अनेक ठिकाणी जलवाहिन्यांना गळती लागल्याने नागरिकांना पाणीप्रश्न भेडसावत आहे. यासंदर्भात झालेल्या चर्चेत प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता विजय मेंगे यांनी गळती काढण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, दोन महिने उलटूनही गळती न निघाल्याने वेदांतिकाराजे भोसले यांच्यासह नागरिकांनी गांधीगिरी करून मेंगे यांना पुष्पगुच्छ देऊन, गेट वेल सून... अशा शुभेच्छा दिल्या. शाहूनगर, जगतापवाडी परिसरातील नागरिकांना मुबलक पाणीपुरवठा व्हावा, ड्रेनेजची सुविधा मिळावी,यासंदर्भात वेदांतिकाराजे यांच्या अध्यक्षतेखाली नागरिक आणि संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांच्या संयुक्त बैठक झाली होती. त्यावेळी कार्यकारी अभियंता मेंगे यांनी शाहूनगर परिसरातील जलवाहिन्यांनी गळती महिनाभरात काढण्याचे आश्वासन दिले होते. दरम्यान, झालेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी बुधवारी सायंकाळी शाहूनगर येथील शिवनेरी कॉलनी येथे वेदांतिकाराजे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी नायब तहसीलदार बाळकृष्ण मोरे, जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे उपअभियंता बी. ए. पाटील, अभियंता टी. बी. अष्टेकर, एस. ए. पांढरे, अभियंता सत्यवान सानप, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अभियंता विजय मेंगे आदी उपस्थित होते. या बैठकीत नागरिकांनी दोन महिने होऊनही गळती काढली नसल्याची तक्रार केली. कामगार नसल्याचे कारण मेंगे यांनी सांगितले. त्यावेळी वेदांतिकाराजे यांनी ‘नागरिकांना अडचणी आहेत. तुम्ही तुमच्या अडचणी सांगून वेळ वाया घालवू नका,’ असे मेंगे यांना सुनावले. ‘तुमच्याकडे कामगार कमी आहेत म्हणून तुम्ही पाणी बिल कमी करता का?,’ असा सवाल वेदांतिकाराजे यांनी केला. यानंतर नागरिकांनी मेंगे यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला. ‘येत्या महिनाभरात शाहूनगर परिसरातील गळती न काढल्यास असहकार आंदोलनचा,’ इशारा वेदांतिकाराजे यांनी दिला.
यानंतर ओढ्यावरील अतिक्रमणे हटवण्याबाबत संबंधितांना नोटीस बजावल्याचे नायब तहसीलदार मोरे यांनी सांगितले. त्रिशंकू भाग असल्याने याठिकाणी सुविधांची वानवा आहे. शाहूनगर परिसरातील सर्व समस्या सोडविण्यासाठी लवकरच जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांची भेट घेतली जाणार आहे. त्यावेळी अधिकाऱ्यांनी उपस्थित राहून शाहूनगर परिसरातील समस्या सोडविण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन वेदांतिकाराजे यांनी केले. (प्रतिनिधी)