साताऱ्यात डीजेच्या दणदणाटामध्ये बाप्पांना निरोप !, मंडळांत रंगली आवाजाची स्पर्धा
By दीपक शिंदे | Published: September 18, 2024 06:28 PM2024-09-18T18:28:53+5:302024-09-18T18:29:52+5:30
तब्बल १६ तास रंगला विसर्जन सोहळा
सातारा : साताऱ्यातील सार्वजनिक गणेश मंडळांकडून मंगळवारी लाडक्या गणरायाला भक्तिपूर्ण निरोप देण्यात आला; परंतु यंदाच्या उत्सवात बहुतांश मंडळांनी पारंपरिक वाद्यांची परंपरा खंडित करून डीजेच्या दणक्यात मिरवणुका काढल्या. नियम डावलून, आवाज वाढवून, लेझर लाईटच्या झगमगाटात काढण्यात आलेल्या या मिरवणुकांनी सर्वसामान्यांच्या अक्षरश: कानठळ्या बसल्या. सकाळी ९:४० वाजता मानाच्या शंकर-पार्वती गणेशाचे विसर्जन झाल्यानंतर बाप्पांचा विसर्जन सोहळा शांत झाला.
गणेशोत्सवास प्रारंभ झाल्यापासून घरोघरी उत्साहात उधाण आले होते. बाप्पांची दहा दिवस मनोभावे आराधना केल्यानंतर अनंत चतुर्दशी दिवशी भाविकांनी आपल्या लाडक्या गणरायाला भक्तिमय वातावरणात निरोप दिला. सातारा शहरातील जलतरण तलाव, हुतात्मा स्मारक, दगडी शाळा, कल्याणी शाळा व बुधवार नाक्यावरील कृत्रिम तळ्यात सकाळपासूनच भाविकांची मूर्ती विसर्जनासाठी रेलचेल सुरू झाली. शहरातील काही मंडळांनी सकाळी लवकर गणेशमूर्ती मंडपाबाहेर काढल्या; मात्र सायंकाळी सहानंतर मिरवणुकांना प्रारंभ झाला.
यंदाच्या विसर्जन मिरवणुकीत बोटावर मोजण्याइतक्या मंडळांनी पारंपरिक वाद्यांची परंपरा जपली. तर बहुतांश मंडळांनी सर्व नियम डावलून डीजेच्या दणक्यात विसर्जन मिरवणुका काढल्या. लेझर लाईटला बंदी असतानाही मिरवणुकांमध्ये लेझरचा झगमगाट पाहायला मिळाला. काही मंडळांमध्ये तर आवाज वाढविण्याची स्पर्धादेखील दिसून आली. डीजेवरील रिमिक्स गाण्यावर तरुणाई बेभान होऊन थिरकताना दिसून आली. पोलिसांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे रात्री १२ वाजता हा दणदणाट शांत झाला.
साताऱ्यातील मानाचा समजल्या जाणाऱ्या शंकर-पार्वती गणेशाचे बुधवारी सकाळी ९:४० वाजता विसर्जन झाले. यानंतर मिरवणुकीचा शेवट झाला. मंगळवारी सायंकाळी पाच ते बुधवारी सकाळी ९:३० असा एकूण सुमारे १६ तास साताऱ्याचा विसर्जन सोहळा रंगला. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी विसर्जन मार्ग व तळ्यांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले होते. शिवाय ठिकठिकाणी कडेकोट पोलिस बंदोबस्तही तैनात होता. त्यामुळे मिरवणूक सोहळा निर्विघ्न पार पडला.
वाई येथे दोन स्वतंत्र मिरवणुका निघाल्याने पोलिसांची डोकेदुखी
वाई : वाई शहरासह तालुक्यातील कोणत्याही गणेश मंडळांनी डॉल्बीचा वापर करू नये, असे पोलिस प्रशासनाने लेखी आदेश काढूनही आदेशाची अंमलबजावणी न करता सर्रास मंडाळांनी डॉल्बीचा वापर केल्याचे चित्र दुर्दैवाने दिसून आले. प्रचंड आवाजात वाईत यावर्षी मिरवणुका निघाल्या. वाई पोलिस प्रशासनाची मंडळांवर कारवाईची जबाबदारी वाढली आहे. किती मंडळांवर कारवाई होणार, हे पाहावे लागणार आहे. शहरातून दोन स्वतंत्र मिरवणुका निघाल्याने पोलिसांना मोठी कसरत करावी लागली. चोख बंदोबस्त ठेवल्याने मिरवणूक शांततेत पार पडली. पालिकेने राबविलेल्या मूर्तीदान योजनेला थंड प्रतिसाद मिळाला.