गणेशमंदिर माचुतरच्या ताब्यात !
By admin | Published: July 3, 2015 09:54 PM2015-07-03T21:54:53+5:302015-07-04T00:04:05+5:30
पोलिसांचा निर्णय : महाबळेश्वरकरांची वादात उडी; मालकीवर केला दावा
महाबळेश्वर : गणेश मंदिराच्या मालकीवरून तीन गावांत सुरू झालेल्या वादातून तोडगा निघण्यापूर्वीच कोणाचीही वाट न पाहता पोलीस खात्याने हे मंदिर माचुतर गावाच्या ताब्यात देण्याचा निर्णय घेतला. मंदिराला ठोकलेले टाळे काढून मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले आहे. दरम्यान, महाबळेश्वर येथील नागरिकांनी या मंदिराच्या मालकीवर दावा करून सुरू झालेल्या वादात उडी घेतली आहे. माचुतर, भेकवली व शिंदोळा या तीन गावांच्या हद्दीवर असलेल्या गणेश मंदिराच्या मालकीवरून वाद सुरू झाला. हा वाद वाढत चालल्यामुळे तीन दिवसांपूर्वी येथील पोलीस निरीक्षक प्रकाश सावंत यांनी मंदिराला टाळे ठोकण्याचा निर्णय घेतला होता. मालकीचा वाद मिटविण्यासाठी तहसीलदार अतुल म्हेत्रे यांच्या अध्यक्षतेखाली तीन गावांच्या प्रमुखांची बैठक पार पडली. परंतु या बैठकीत कोणताच निर्णय झाला नाही.
यासंदर्भात जोरदार चर्चा झाल्याने मंदिराचे टाळे काढण्याचा निर्णय पोलीस निरीक्षकांनी घेतला. मंदिराच्या चाव्या त्यांनी माचुतर ग्रामस्थांच्या स्वाधीन करण्याचा निर्णय घेतला. माचुतर गावचे व नगराध्यक्ष किसन शिंदे यांच्याकडे मंदिराच्या चाव्या देण्यात आल्या. मंदिराच्या चाव्या मिळताच शुक्रवारी सकाळी गणपतीला अभिषेक घालण्यात आला व मंदिराचा दैनंदिन पूजापाठ सुरू झाला.
दरम्यान, येथील भाजपाचे जिल्हा सरचिटणीस रवींद्र कुंभारदरे, शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख राजेश कुंभारदरे, शिवसेनेचे शहर प्रमुख विजय नायडू यांनी तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना निवेदन देऊन या मंदिरावर मालकी महाबळेश्वरकरांची आहे, असा दावा केला आहे.
निवेदनात म्हटले आहे की, गणेशमंदिर हे पौराणिक आहे. या मंदिराची पडझड होऊन हे मंदिर मोडकळीस आले होते. दावा करणारे गावकरी यांनीही या मंदिराच्या जीर्णोद्धाराकडे दुर्लक्ष केले होते. महाबळेश्वर येथील नागरिक मात्र नित्य नेमाने या मंदिरात दर्शनासाठी जात होते. तेव्हा या मंदिराच्या जीर्णोद्धाराची मागणी जोर धरू लागली. तत्कालीन नगराध्यक्ष अशोक नायडू, भालचंद्र रानडे तसेच येथील हनुमान मंदिर ट्रस्ट व राम मंदिर ट्रस्टचे विश्वस्त यांनी याबाबत पुढाकार घेतला. गावातून वर्गणी काढली व जीर्णोद्धाराचे काम हाती घेतले. रक्कम कमी पडत होती म्हणून गावातील तरुणांनी या मंदिरासाठी श्रमदान करण्याचा निर्णय घेतला. आता मालकीचा दावा करणारे श्रमदानासाठी आले नव्हते. म्हणून या मंदिरावर कोणत्याही गावाचा हक्क नाही. (प्रतिनिधी)
भाविकांना वेठीस धरु नये...
‘हे मंदिर भेकवलीच्या हद्दीत असले तरी सर्व व्यवस्था माचुतर गावची मंडळी पाहतात. या संदर्भात सर्व कागदपत्रे सादर केली आहेत. या मंदिरातील दानपेटीतून मिळणारी रक्कम बँकेत भरली जाते व सर्व खर्च हा बँक खात्यातून केला जातो. हा सर्व व्यवहार पारदर्शक आहे. या मंदिराचे वीजबिल देखील माचुतर गावचे ग्रामस्थ किसन शिंदे यांच्या नावे आहे. कोणीही कायदा हातात घेऊन भाविक व पर्यटकांना वेठीस धरण्याचा प्रयत्न करू नये,’ असे आवाहन निरीक्षक प्रकाश सावंत यांनी केले आहे.’