गणेशोत्सव मंडळांची बैठक घ्यावी : माधवी कदम, जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2020 06:06 PM2020-08-10T18:06:29+5:302020-08-10T18:07:23+5:30
सार्वजनिक मंडळांकडून गणेशोत्सव साजरा करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. परंतु प्रशासनाकडून त्यांना उत्सवाबाबत कोणतीही नियमावली मिळालेली नाही. यासाठी सातारा शहरातील मंडळांची बैठक घेण्यात यावी, अशी विनंती नगराध्यक्षा माधवी कदम यांनी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्याकडे केली आहे.
सातारा : सार्वजनिक मंडळांकडून गणेशोत्सव साजरा करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. परंतु प्रशासनाकडून त्यांना उत्सवाबाबत कोणतीही नियमावली मिळालेली नाही. यासाठी सातारा शहरातील मंडळांची बैठक घेण्यात यावी, अशी विनंती नगराध्यक्षा माधवी कदम यांनी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्याकडे केली आहे.
याबाबत दिलेल्या पत्रात नमूद केले आहे की, सातारा शहरात कोरोना बाधितांची संख्या हळूहळू वाढू लागली आहे. ही रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी जिल्हा प्रशासन व पालिकेची आरोग्य यंत्रणा सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. गणेशोत्सव अवघ्या दहा दिवसावर येऊन ठेपला आहे. सार्वजिक गणेशोत्सव मंडळांनी उत्सवाची तयारीही सुरू केली आहे.
एकीकडे कोरोनाचे संक्रमण वाढत असताना दुसरीकडे गणेशमंडांना उत्सव कशा पद्धतीने साजरा करावा, याबाबत कोणतीही नियमावली मिळालेली नाही. बकरी ईदसाठी ज्याप्रमाणे शांतता कमिटीची बैठक बोलावण्यात आली तशीच बैठक तातडीने बोलवण्याची विनंती पत्राद्वारे करण्यात आली.
या बैठकीत नियमावली जाहीर झाल्यास मंडळांच्या अध्यक्षांना कोणतेही संभ्रम राहणार नाही व गणेशोत्सव नियमांचे पालन करून साजरा केला जाईल, असेही पत्रात नमूद करण्यात आले आहे.