Satara: घरफोडीनंतर दुचाकीवरुन धूम स्टाईलने पळून जाणारी टोळी जेरबंद, ७० लाखांचा मुद्देमाल हस्तगत
By नितीन काळेल | Published: November 16, 2023 06:21 PM2023-11-16T18:21:36+5:302023-11-16T18:21:50+5:30
तीनवर्षांपासून राज्यातील पोलिसांना गुंगारा
सातारा : घरफोडी करुन दुचाकीवरुन धूम स्टाईलने पळून जाणाऱ्या आणि राज्यातील पोलिसांना तीन वर्षांपासून गुंगारा देणाऱ्या टोळीला सातारा जिल्हा पोलिस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले. तसेच संबंधितांकडून घरफोडीचे २७ गुन्हे उघड करुन एकूण ७० लाखांचा मुद्देमालही हस्तगत करण्यात आला आहे. जिल्हा पोलिस दलाच्या या कारवाईचे स्वागत होत आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, मार्च २०२२ ते जुलै २३ या कालावधीत जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्याच्या हद्दीत दुचाकीवरुन सहा ते सात जण येऊन घरफोड्या करुन पळून जात हेाते. या गुन्ह्यांचे गांभिर्य ओळखून पोलिस अधीक्षक समीर शेख, अतिरिक्त पोलिस अधीक्षक आॅंचल दलाल यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अरुण देवकर यांना संबंधित टोळीला पकडण्याची सूचना केली होती.
त्यानुसार देवकर यांनी सहायक पोलिस निरीक्षक सुधीर पाटील, रवींद्र भोरे, उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे आणि अमित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पथके तयार केली. तसेच टोळीची माहिती घेतली असता संबंधित सातारा जिल्ह्यात दोन ते तीन दुचाकीवरुन येऊन एक रात्रीत आठ ते दहा घरफोड्या करुन ताशी १२० ते १४० च्या वेगाने जात असल्याचे समोर आले. तसेच निरीक्षक देवकर यांनी एकाला पुणे जिल्ह्यात पाठवून टोळीवर लक्ष देण्यास सांगितले. संबंधितांकडून देवकर यांना माहिती मिळत होती.
आॅगस्ट महिन्यात टोळीतील तीन आरोपी पुणे जिल्ह्यातील पाैड परिसरात असल्याची माहिती समजल्यानंतर पोलिस निरीक्षक अरुण देवकर यांनी भुईंज ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक रमेश गर्जे, गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक भोरे, उपनिरीक्षक शिंगाडे, पाटील यांच्या पथकाला संबंधितांना ताब्यात घेण्याची सूचना केली. त्यावेळी पावसात सापळा लावून सुरदेव सिलोन नानावत (वय ३३, रा. घाेटावडे, ता. मुळशी), राम धारा बिरावत (रा. करमोळी, ता. मुळशी) आणि परदुम सिलोन नानावत (रा. घोटावडे) यांना शिताफीने पकडले. त्यावेळी त्यांना भुईंज ठाण्याच्या गुन्ह्यात अटक केलेली. त्यांनी जिल्ह्यातील विविध पोलिस ठाणे हद्दीत घरफोड्या केल्याचे कबूल केले होते.
तसेच घरफोडीतील सोने, चांदी गुजरातमधील एक महिला सराफ तसेच साेनपालसिंग नारायणसिंग रजपूत आणि प्रदीप आसनदास खटवानी यांना विक्री केल्याचेही सांगितले. या माहितीच्या आधारे पोलिसांनी महिला सराफ आणि प्रदीप खटवानीला ताब्यात घेतले. तसेच या संशयितांच्या संपर्कात वामन नंदू राठोड (रा. फंडवस्ती, रांजणगाव, जि. पुणे), वाल्मिक रामभाऊ शेखावत (रा. पाटस, ता. दाैंड, पुणे) होते हेही तपासात समोर आले. स्थानिक गुन्हे शाखेच्या या कारवाईचे स्वागत होत आहे.
गुजरातमध्ये जाऊन दागिने हस्तगत..
सातारा जिल्ह्यातील घरफोडीत चोरीत गेलेला सोन्या-चांदीचा एेवज पोलिसांनी जप्त केला आहे. १०३ तोळ्यांचे सोन्याचे दागिने आणि चांदीचे पाच किलो वजनाचे दागिने हस्तगत करण्यात आले. हे दागिने गुजरातमध्ये जाऊन जप्त करण्यात आले आहेत. याची किंमत सुमारे ७० लाख रुपये आहे. सातारा जिल्ह्यातील मेढा, भुईंज, खंडाळा, सातारा तालुका, वडूज, वाठार, उंब्रज, बोरगाव, वाई, शिरवळ, मल्हारपेठ, कऱ्हाड तालुका पोलिस ठाणे हद्दीत घरफोड्या झाल्या आहेत.