Satara: पिस्तुलांसह दरोड्याच्या तयारीतील टोळी गजाआड, पाच जणांना अटक; कऱ्हाडात कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2024 03:23 PM2024-05-22T15:23:10+5:302024-05-22T15:23:26+5:30
तीन गावठी पिस्तूल, काडतूस, सुरा, कोयते हस्तगत
कऱ्हाड : दरोड्याच्या तयारीत असलेल्या पाच जणांच्या टोळीला पोलिसांनी थरारक पाठलाग करून पकडले. त्यांच्याकडून तीन गावठी पिस्तुले, जिवंत काडतुसांसह घातक शस्त्रे जप्त केली आहेत. ही कारवाई विद्यानगर-कऱ्हाड येथील जयराम कॉलनीत सोमवारी दुपारी अडीचच्या सुमारास शहर पोलिस ठाण्याच्या गुन्हे शाखेने केली.
बबलू उर्फ विजय संजय जावीर (वय ३२, रा. शहापूर, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर), निकेत वसंत पाटणकर (रा. गोडोली, सातारा), सूरज नानासाहेब बुधावले (रा. विसापूर-पुसेगाव, जि. सातारा), राहुल अरुण मेमन (रा. केरळ, सध्या रा. विद्यानगर, कऱ्हाड) व आकाश आनंदा मंडले (रा. खटाव, जि. सातारा) अशी पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केलेल्यांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिस अधीक्षक समीर शेख व अपर अधीक्षक ऑंचल दलाल यांच्या आदेशानुसार कऱ्हाड शहर पोलिस ठाण्याच्या गुन्हे शाखेचे पथक वरिष्ठ पोलिस निरीक्षक के.एन. पाटील, निरीक्षक महेंद्र जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवारी दुपारी शहरासह परिसरात गस्त घालत होते. त्यावेळी विद्यानगर येथील जयराम कॉलनीत सशस्त्र दरोडा पडणार असल्याची माहिती या पथकाला मिळाली.
त्यानुसार, उपनिरीक्षक पतंग पाटील पथकासह तातडीने त्या ठिकाणी दाखल झाले. त्यांनी पाठलाग करून दरोड्याच्या तयारीत असलेल्या टोळीला पकडले. या टोळीकडून तीन देशी बनावटीची पिस्तुले, चार जिवंत काडतूस, एक धारदार सुरा, दोन कोयते, दोन दुचाकी यासह दरोड्यासाठी आवश्यक असणारे साहित्य पोलिसांनी हस्तगत केले.
पोलिसांनी अटक केलेली दरोडेखोरांची टोळी सशस्त्र दरोडा टाकण्याच्या तयारीत होती. मात्र, त्यापूर्वीच पोलिसांनी या टोळीच्या मुसक्या आवळल्या. याबाबतची नोंद कऱ्हाड शहर पोलिस ठाण्यात झाली आहे.
टोळीवर गंभीर गुन्हे दाखल
पोलिसांनी अटक केलेल्या टोळीवर विविध पोलिस ठाण्यांमध्ये गंभीर गुन्हे दाखल आहेत. ही टोळी पोलिसांच्या रेकॉर्डवरील टोळी असून यापूर्वी त्यांच्यावर खून, दरोडा, जबरी चोरी, मारहाण, आर्म ॲक्ट यासह इतर गंभीर गुन्हे दाखल आहेत. सोमवारीही ते दरोडा टाकण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन अटक केले.
आरोपींवर यापूर्वी दाखल गुन्हे
बबलू उर्फ विजय जावीर : खून, दरोडा, जबरी चोरी, सरकारी नोकरावर हल्ला असे सहा गुन्हे
निकेत पाटणकर : खून, दरोडा, जबरी चोरी, मारहाण असे ९ गुन्हे
सूरज बुधावले : खून, आर्म ॲक्ट यासारखे २ गंभीर गुन्हे
राहून मेनन : खून, घरफोडी, दरोडा, जबरी चोरी असे ४ गुन्हे