महिलेवर सामूहिक अत्याचार, सहा जणांविरोधात गुन्हा; सातारा जिल्ह्यातील धक्कादायक घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2023 07:15 PM2023-07-08T19:15:28+5:302023-07-08T19:27:54+5:30
फलटण (जि.सातारा) : फलटण तालुक्यात एका महिलेवर सामूहिक अत्याचाराची घटना घडली आहे. हा प्रकार तीन आठवड्यांपूर्वी झाला असून, या ...
फलटण (जि.सातारा) : फलटण तालुक्यात एका महिलेवर सामूहिक अत्याचाराची घटना घडली आहे. हा प्रकार तीन आठवड्यांपूर्वी झाला असून, या प्रकरणी आता फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात सहा जणांच्या विरोधात अत्याचारासह ॲट्रॉसिटीचा गुन्हा नोंद झाला आहे. दरम्यान, या प्रकरणात पीडितेशी संबंधित दोन मजूर व तिचे नातेवाईक अशा सहा जणांची सुटका पोलिसांनी केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, रायगड जिल्ह्यातील एक कुटुंब फलटण तालुक्यात मजुरीसाठी आले होते. चार दिवस काम केल्यानंतर, पीडित महिलेवर १९ जूनला रात्री सहा जणांनी सामूहिक अत्याचार केला.
अत्याचारानंतर हे कुटुंब पंढरपूर व त्यानंतर आपल्या रायगड जिल्ह्यातील मूळ गावी गेले. त्यानंतर, पीडित महिलेला मीरा-भाईंदर पोलिस स्टेशन व सामाजिक काम करणाऱ्या संस्थेच्या मदतीने फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात आणले. या प्रकरणी तक्रार दिल्यानंतर संशयित सहा जणांच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे.
फलटण ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी जाऊन अन्य दोन मजुरांची, त्याचप्रमाणे पीडित महिलेची दोन लहान मुले व सासू, सासरा अशा चौघांची सुटका करून, त्यांच्या पुनर्वसनासाठी प्रक्रिया सुरू केली आहे. फलटण ग्रामीण पोलिसांनी हे प्रकरण अतिसंवेदनशील असल्याचे सांगत, संशयितांची नावे उघड केलेली नाहीत.