सल्याच्या टोळीला ‘मोक्का’मध्ये अटक
By admin | Published: October 15, 2015 10:48 PM2015-10-15T22:48:00+5:302015-10-16T00:52:08+5:30
पोलीस कोठडीत रवानगी : सल्याचा मुलगा, मेहुण्यासह सहाजणांचा समावेश
कऱ्हाड : कुख्यात गुंड सलीम शेख ऊर्फ सल्या चेप्या टोळीला गुरुवारी कऱ्हाड पोलिसांनी ‘मोक्का’च्या गुन्ह्यात अटक केली. त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले असता सहा दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश देण्यात आला आहे. पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींमध्ये सल्याचा मुलगा, मेहुणा व चालकाचा समावेश आहे.फिरोज बशिर कागदी (वय ३३), इब्राहिम गफूर सय्यद (४८, दोघेही रा. शनिवार पेठ, कऱ्हाड), मोहसीन दिलावर जमादार (२७, रा. शास्त्रीनगर-मलकापूर, मूळ रा. निपाणी, जि. बेळगाव), जावेद साहेबलाल शेख (२८, रा. मार्केट यार्ड, कऱ्हाड), इरफान हारुण इनामदार (२६, रा. शिंदे गल्ली, कऱ्हाड) व सल्याचा मुलगा आसिफ सलीम शेख (२२, रा. शिंदे गल्ली, कऱ्हाड) अशी ‘मोक्का’मध्ये अटक करण्यात आलेल्या सहाजणांची नावे आहेत.
शहरातील भाजी मंडई परिसरात २० जुलै २०१५ रोजी सकाळी बाबर खानने बबलू मानेवर गोळ्या झाडून त्याचा खून केला. त्यानंतर जमावाने बाबर खानला त्याचठिकाणी ठेचून ठार मारले. या घटनेमुळे कऱ्हाड शहर टोळीयुद्धाचे केंद्र बनत असल्याचे समोर आले. पोलिसांनी बबलू माने खून प्रकरणाच्या तपासासह शहरातील गुंडांच्या मुसक्या आवळण्यास त्यावेळी सुरुवात केली. बबलूच्या खूनप्रकरणी कऱ्हाड शहर पोलिसांनी सुरुवातीला फिरोज कागदीला अटक केली. त्यानंतर इब्राहिम सय्यद, मोहसीन जमादार, जावेद शेख, इरफान इनामदार, आसिफ शेख या पाचजणांना अटक झाली. सल्या चेप्या हा शहरातील नामचिन गुंड असून, तो १९८९ सालापासून गुन्हेगारी क्षेत्रात कार्यरत आहे. त्याच्यावर ३२ दखलपात्र तर २ अदखलपात्र गुन्हे दाखल आहेत. सातारा व सांगली जिल्ह्यांतील विविध पोलीस ठाण्यांच्या रेकॉर्डवरील तो गुन्हेगार आहे. स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी त्याने यापूर्वी अनेकवेळा वेगवेगळे साथीदार सोबत घेऊन गुन्ह्यांचा नियोजनबद्ध कट केला आहे. तसेच खून, खुनाचा प्रयत्न, गर्दी मारामारी, अपहरण, खंडणी असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे त्याने साथीदारांच्या मदतीने केले आहेत. सध्याही त्याची ही गुन्हेगारी कृत्य सुरू आहेत. त्यामुळे त्याच्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगार नियंत्रण अधिनियमाद्वारे मोक्काची कारवाई करण्यात यावी, असा प्रस्ताव कऱ्हाड शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक बी. आर. पाटील यांनी तयार करून तो आॅगस्ट महिन्याच्या अखेरीस पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांच्यामार्फत कोल्हापूरला विशेष पोलीस महानिरीक्षकांकडे पाठविला.
पोलीस महानिरीक्षकांनी ६ आॅक्टोबर रोजी या प्रस्तावाला मंजुरी दिली. त्यानंतर सल्यासह त्याच्या सहा साथीदारांवर ‘मोक्का’अंतर्गत कारवाईच्या हालचाली सुरू झाल्या. यापूर्वीच बबलू माने खून प्रकरणात अटक असणाऱ्या सहाजणांना पोलिसांनी गुरुवारी मोक्का गुन्ह्यात वर्ग करून घेतले. त्यानंतर त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली. पोलीस उपअधीक्षक राजलक्ष्मी शिवणकर तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)
सल्या न्यायालयीन कोठडीत
बबलू माने खून प्रकरणात कुख्यात गुंड सल्या चेप्या याच्यावरही मोक्काची कारवाई करण्यात आली आहे. मात्र, त्याला अद्याप मोक्काच्या गुन्ह्यात अटक करण्यात आलेली नाही. सल्या सध्या सांगलीच्या एका प्रकरणात अटकेत असून, तो न्यायालयीन कोठडीत आहे.