Satara News: तांब्याच्या तारा चोरणाऱ्या टोळीचा धुमाकूळ, कृष्णा नदीकाठी वीज पंप असलेले शेतकरी त्रस्त
By दीपक शिंदे | Published: March 13, 2023 05:26 PM2023-03-13T17:26:22+5:302023-03-13T17:26:46+5:30
शेतकऱ्यांचे अडीच ते तीन लाखांचे नुकसान
कऱ्हाड : बेलवडे हवेली, ता. कऱ्हाड येथे कृष्णा नदीकाठी वीज पंप असलेले शेतकरी सध्या त्रस्त झाले आहेत. तांब्याच्या तारा चोरणाऱ्या टोळीने कृष्णाकाठावर धुमाकूळ घातला असून बेलवडेतील वीसपेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या वीज पंपाच्या केबल चोरट्यांनी लंपास केल्या आहेत. कित्येक मीटर लांबीच्या वायर चोरट्यांनी चोरल्यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
कृष्णा नदीकाठावर असलेल्या वीज पंपांची वायर चोरून नेण्याच्या घटना सध्या वाढल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना नवीन संकटाचा सामना करावा लागत आहे. बेलवडे हवेली येथे गत पाच दिवसांत चोरट्यांनी नदीकाठच्या तब्बल वीसहून अधिक शेतकऱ्यांच्या विद्युत पंपांच्या केबल रात्री कापून चोरून नेल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे अडीच ते तीन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
बेलवडे हवेली गावाजवळून वाहणाऱ्या कृष्णा नदीतूनच परिसरातील शेतकऱ्यांनी पाणीपुरवठा योजना करून शेतीसाठी पाणी नेले आहे. त्यासाठी गावातील प्रत्येक शेतकऱ्याचा विद्युत पंप नदीवर आहे. प्रत्येक वर्षी नदीला पूर येत असल्यामुळे नदीपासून सुमारे २०० ते ३०० मीटर अंतरावर प्रत्येकाने विद्युत पेटी बसवली आहे. त्या विद्युत पेटीपासून नदीपर्यंत केबल टाकत पंपाला वीज पुरवठा करण्यात आला आहे. वीज केबलमध्ये तांबे धातू असतो. आणि त्या धातूला बाजारात चांगली किंमत मिळते. त्यामुळे या केबलवर चोरट्यांनी डल्ला मारला आहे.
वीज पंपाच्या केबल चोरीस गेल्यामुळे उन्हाळ्यात शेतीला पाणी कसे द्यायचे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. यापूर्वीही असे प्रकार घडले आहेत. सातत्याने होणाऱ्या चोऱ्यांमुळे परिसरातील शेतकरी त्रस्त झाले असून वारंवार होणाऱ्या चोरीमुळे मोठे नुकसान होत आहे. तळबीड पोलिसांनी चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.
दरम्यान, ऐन उन्हाळ्यातच चोरट्यांनी शेतकऱ्यांच्या विद्युत पंपाच्या केबल चोरून गेल्यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठे संकट निर्माण झाले आहे. आर्थिक नुकसानीबरोबरच विद्युत पंप बंद राहत असल्यामुळे पाण्याअभावी पिके वाया जाण्याचे दुहेरी संकट निर्माण झाले आहे.
शेतकऱ्यांचे अडीच ते तीन लाखांचे नुकसान
बेलवडे हवेलीत गत काही दिवसांपासून केबल कापून चोरून नेण्याचे प्रमाण वाढले आहे. दोन दिवसांपूर्वी तर एकाच रात्री दहा ते बारा शेतकऱ्यांच्या विद्युत पंपाला जोडलेल्या केबल रात्रीच्या वेळी कापून चोरून नेण्यात आल्या आहेत. नारायण पवार, माजी सभापती दाजी पवार, संग्राम पवार, दत्तात्रय पवार, अंकुश पवार, मारुती पवार, विजयसिंह पाटील, रमेश पाटील, संग्राम पवार यांच्यासह २० ते २५ शेतकऱ्यांच्या वीज पंपाच्या केबल चोरीला गेल्या आहेत. त्यांचे अडीच ते तीन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.