जनावरे चोरी करणारी टोळी वाठारमध्ये अटकेत
By admin | Published: December 25, 2016 11:33 PM2016-12-25T23:33:12+5:302016-12-25T23:33:12+5:30
दोघे पुणे जिल्ह्यातील : एकजण रायगडचा
वाठार स्टेशन : कोरेगाव तालुक्यातील वाठार स्टेशन पोलिस ठाणे हद्दीत जनावरांची चोरी करणाऱ्या तिघांच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या आहेत. अटक करण्यात आलेल्यांपैकी दोघेजण पुणे, तर एक रायगड जिल्ह्यातील रहिवासी आहे. अटक करण्यात आलेल्यांकडून चोरीस गेलेली जनावरे ताब्यात घेतली आहेत.
सागर बंडू यादव (वय २१, रा. बावेखल, ता. भोर), बारक्या आनंदा सपकाळ (२०, रा. वेनपुरी, ता. भोर, जि. पुणे) आणि संजय ऊर्फ पप्प्या साधू सपकाळ (२३, रा. ढालकाठी, ता. महाड, जि. रायगड) या तिघांना अटक केली आहे.
वाठार स्टेशन पोलिस ठाणे हद्दीतील सोनके, सोळशी, नायगाव येथील अंदाजे तीन लाख रुपये किमतीची गाय, म्हैस व बैलांची चोरी करण्यात आली होती. याप्रकरणी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल होती. काही दिवसांपूर्वीच पुरंदर तालुक्यातील सासवड येथे जनावरे वाहतूक करणाऱ्या एका वाहनावर पोलिसांनी कारवाई केली होती. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर वाठारचे सहायक पोलिस निरीक्षक शहाजी निकम यांनी संबंधित टोळीकडे कसून चौकशी केली. त्यावेळी या टोळीने वाठार ाोलिस ठाणे हद्दीतील जनावरांची चोरी केल्याची कबुली दिली. पोलिस उपअधीक्षक प्रेरणा कट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक निकम, उपनिरीक्षक ए. ए. चिंचकर, व्ही. के. धुमाळ, आर. ए. कांबळे, एम. जी. भोसले, एस. एस. जाधव, टी. एस. आडके यांनी कारवाई केली.