कुऱ्हाडीच्या धाकाने काॅपर वायर चोरणारी टोळी अटकेत; १५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत
By दत्ता यादव | Published: November 3, 2023 10:53 AM2023-11-03T10:53:52+5:302023-11-03T10:54:17+5:30
उंब्रज पोलिसांची कारवाई
दत्ता यादव, लोकमत न्यूज नेटवर्क, सातारा : सडावाघापूर-जांभेकरवाडी, ता. पाटण येथे पवनचक्कीच्या कर्मचाऱ्यांना कुऱ्हाडीचा धाक दाखवून काॅपर वायर चोरून नेणाऱ्या टोळीच्या उंब्रज पोलिसांनी मुसक्या आवळल्या. त्यांच्याकडून काॅपर वायरचे तुकडे, कुऱ्हाड, लाकडी दांडके, वायर कटर, टेम्पो ट्रँव्हलर असा सुमारे १५ लाख ४० हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला.
अनिल लक्ष्मण पवार (वय ४६) सुरेश बंडू निकम (वय ४०, (दोघेही रा. म्हारवंड, ता. पाटण), दादासो बळीराम सपकाळ (वय ५४, रा. बागलेवाडी, ता. पाटण), प्रकाश गुलाबराव जाधव (वय ५०, रा. कळंबे, ता. पाटण) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, सडावाघापूर-जांभेकरवाडी येथील सुझलाॅन कंपनीच्या साईटवर कंपनीचे कर्मचारी ३० ऑक्टोबर रोजी रात्री तीन वाजता गस्त घालत होते. त्यावेळी वरील संशयितांनी कंपनीच्या कर्मचाऱ्यांना कुऱ्हाडीचा धाक दाखवून काॅपर वायर चोरून नेली. कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी हा प्रकार तातडीने उंब्रज पोलिस आणि डायल ११२ला काॅल करून माहिती दिली. उंब्रज पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक प्रशांत बधे यांनी या प्रकरणाची तातडीने दखल घेतली. एक पथक तयार करून ते स्वत: आरोपींच्या शोधासाठी पहाटे जांभेकरवाडी परिसरात गेले. त्यांच्यासमवेत पोलिसांची टीम आणि पाटण तालुक्यातील ढोरोशी येथील पोलिस पाटील राहुल पुजारी, जळवचे पोलिस पाटील अधिकराव पवार, जांभेकरवाडीचे पोलिस पाटील विजय कदम हे होते. या सर्वांनी आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली. त्यावेळी जळवखिंडीजवळ टेम्पो ट्रँव्हलर उभा असलेल्या शोध पथकाला दिसला. या ठिकाणी एक आरोपी दबा धरून बसला होता. त्याला पोलिसांनी पकडले. त्याच्याकडे कसून चाैकशी केल्यानंतर संबंधित आरोपीने इतर सहकाऱ्यांची नावे सांगितली. त्यानंतर पोलिसांनी सकाळपर्यंत सर्वच आरोपींना अटक केली.
पोलिस अधीक्षक समीर शेख, अपर पोलिस अधीक्षक आंचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक प्रशांत बधे, पोलिस उपनिरीक्षक अनिल पाटील, हवालदार सचिन जगताप, संजय धुमाळ, नीलेश पवार आदींनी या कारवाईत सहभाग घेतला.