गुंडांच्या टोळ्या तडीपारीच्या ‘रडार’वर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 05:10 AM2021-03-13T05:10:30+5:302021-03-13T05:10:30+5:30
कऱ्हाड : टोळीयुद्धाने धुमसणारं कऱ्हाड आता शांत झालंय. अंतर्गत कुरबुरी सुरू असल्या तरी गुंडगिरीला चांगलाच चाप बसलाय. भाईगिरीला पोलिसांनी ...
कऱ्हाड : टोळीयुद्धाने धुमसणारं कऱ्हाड आता शांत झालंय. अंतर्गत कुरबुरी सुरू असल्या तरी गुंडगिरीला चांगलाच चाप बसलाय. भाईगिरीला पोलिसांनी खीळ घातलीय. मात्र, एवढं करूनही काही टोळ्या सक्रिय होताना दिसताहेत. आणि याच टोळ्या सध्या पोलिसांच्या ‘रडार’वर आहेत.
कऱ्हाडातील शेख टोळीचा हस्तक असलेल्या अशिष पडळकरच्या टोळीला गत आठवड्यात तडीपार करण्यात आले आहे. त्यापूर्वीही आणखी दोन टोळ्यांच्या तडीपारीचे आदेश झाले आहेत. या तडीपारीमुळे गुन्हेगारी पूर्णपणे थांबणार नसली तरी त्याला चाप लागण्यास मदत होणार आहे. वास्तविक, कऱ्हाडला गुन्हेगारीचा मोठा इतिहास आहे. पूर्वी शहरात मोठ्या प्रमाणावर टोळ्या सक्रिय होत्या. वर्चस्ववादातून त्यांच्यात खटके उडायचे. हा वाद एवढा विकोपाला जायचा की, कायदा-सुव्यवस्थेचे अक्षरश: धिंडवडे निघायचे. मात्र, या वाढत्या टोळीयुद्धाला लगाम घालण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली. पटावरची प्यादी हेरली आणि त्यांच्या मुसक्या आवळल्या. त्यामुळे गत काही वर्षांत कऱ्हाडातील गुन्हेगारी टोळ्या मोडीत निघाल्या आहेत.
गत दोन वर्षांत नव्याने काही टोळ्या कऱ्हाडात सक्रिय होण्याच्या तयारीत होत्या. गुन्हेगारांनी त्यांची पथारीही पसरलेली. मात्र, ऐनवेळी त्या टोळीची दहशत मोडीत काढण्याचा प्रयत्न पोलिसांकडून झाला. त्यामुळे संघटित गुन्हेगारीवर काही प्रमाणात नियंत्रण आले. एकीकडे कऱ्हाड शहरात नव्याने काही टोळ्या बाळसं धरीत असताना मलकापूरसारख्या उपनगरातही टोळ्यांनी आपले बस्तान बसविण्यास सुरुवात केली होती. गत काही वर्षांत घडलेल्या गुन्हेगारी घटनांमध्ये मलकापुरातील गुंडांच्या टोळीचा सहभाग अधोरेखित झाला आहे. त्यामुळे कऱ्हाडबरोबरच मलकापुरात नव्याने तयार होत असलेल्या या टोळ्यांभोवती कारवाईचा फास आवळण्याचे आव्हान पोलिसांसमोर होते. आणि पोलिसांनीही तडीपारीच्या माध्यमातून या टोळ्यांच्या कारवाया रोखण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
- चौकट
पोलिसांचा थेट मुळावर घाव
टोळीचा प्रमुख एखाद्या गुन्ह्यात तुरुंगात असेल अथवा त्याच्यावर काही कारवाई झाली असेल, तर त्या टोळीचा उपद्रव कमी होतो. मात्र, टोळी पूर्णपणे निष्क्रिय होत नाही. टोळीप्रमुखाचा हस्तक काहीवेळा ती टोळी चालवितो. त्यामुळे त्या टोळीच्या लहानमोठ्या गुन्हेगारी कारवाया सुरूच राहतात. गुन्हेगारी टोळ्यांची हीच पद्धत ओळखून कऱ्हाडच्या पोलिसांनी थेट मुळावरच घाव घालण्यास सुरुवात केली आहे. संपूर्ण टोळीच तडीपार करण्याचा पोलिसांकडून प्रयत्न होत आहे.
- चौकट
... अशी होते कारवाई
१) एखादा गुन्हेगार अथवा चारपेक्षा जास्त जणांची टोळी क्रियाशील असेल तर सुरुवातीला प्रतिबंधात्मक कारवाई होते.
२) कारवाईनंतरही गुन्हे सुरूच असतील तर त्यांचे रेकॉर्ड तयार केले जाते. त्याद्वारे तडीपारीचा प्रस्ताव तयार केला जातो.
३) प्रस्ताव एकाविषयी असेल तर तो प्रांताधिकाऱ्यांकडे पाठविला जातो. तर टोळीचा प्रस्ताव जिल्हा पोलीस प्रमुखांकडे सादर करण्यात येतो.
४) पोलीस प्रमुख टोळीच्या प्रस्तावाबाबत पोलीस उपअधीक्षकांना छाननीचे आदेश देतात. उपअधीक्षक म्हणणे मागवून तो अहवाल पोलीस प्रमुखांकडे पाठवितात.
५) पोलीस अधीक्षक कार्यालयात सुनावणी झाल्यानंतर पोलीस प्रमुखांकडून त्या टोळीच्या तडीपारीबाबतचा आदेश देतात.
६) कधी तालुक्यातून, कधी जिल्ह्यातून, तर कधी एकापेक्षा जास्त जिल्ह्यातून ती टोळी तडीपार केली जाते.
- चौकट
तीन टोळ्यांवर तडीपारीची कारवाई
७ जुलै २०२०
६ आरोपी : टोळी प्रद्युम्न सोळवंडे
गुन्हे - खुनाचा प्रयत्न, मारामारी, बेकायदा शस्त्र
६ जानेवारी २०२१
४ आरोपी : टोळी अभिनंदन झेंडे
गुन्हे - मारामारी, खंडणी, खुनाचा प्रयत्न
५ मार्च २०२१
४ आरोपी : टोळी आशिष पडळकर
गुन्हे - खुनाचा प्रयत्न, मारामारी, गंभीर दुखापत
- कोट
कऱ्हाडातील गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. यापूर्वी तीन टोळ्यांचे प्रस्ताव आम्ही पाठविले होते. त्या टोळ्या तडीपार झाल्या आहेत. सध्या आणखी दोन टोळ्यांचे प्रस्ताव आम्ही तयार केले आहेत. गुन्हेगारी कारवाया आणि त्यानुषंगाने सुरू असलेले गुन्हे रोखण्यावर आमचा भर आहे.
- विजय गोडसे, सहायक निरीक्षक
गुन्हे प्रकटीकरण शाखा, कऱ्हाड
फोटो : ११केआरडी०३, ०४, ०५
कॅप्शन : प्रतीकात्मक