Satara: वकिलाच्या पेहराव्यात न्यायालयात आला, अन् गुंड बंटी जाधववर गोळीबार केला; पोलिसांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला

By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2023 12:12 PM2023-08-08T12:12:11+5:302023-08-08T12:12:35+5:30

घटनेमुळे न्यायालयात प्रचंड घबराट पसरली.

Gangster Bunty Jadhav came in the guise of a lawyer and fired at the court, disaster was averted due to police vigilance | Satara: वकिलाच्या पेहराव्यात न्यायालयात आला, अन् गुंड बंटी जाधववर गोळीबार केला; पोलिसांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला

Satara: वकिलाच्या पेहराव्यात न्यायालयात आला, अन् गुंड बंटी जाधववर गोळीबार केला; पोलिसांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला

googlenewsNext

वाई : मेणवली, ता. वाई येथील हॉटेल मालकास खंडणी मागितल्याप्रकरणी अनिकेत उर्फ बंटी नारायण जाधव (रा. भुईंज), निखील मोरे, अभिजित शिवाजी मोरे (रा. गंगापुरी, वाई) यांच्यावर वाई न्यायालयातच गोळीबार करण्यात आला. सुदैवाने दोन गोळ्या झाडूनही कोणाला दुखापत झाली नाही. पोलिसांनीगोळीबार करणाऱ्या राजेश नवघने याला जागेवरच ताब्यात घेतले. ही खळबळजनक घटना सोमवारी दुपारी चारच्या सुमारास न्यायालयाच्या व्हरांड्यात घडली.

याबाबत अधिक माहिती अशी की, ‘मोक्का’च्या गुन्ह्यात कळंबा कारागृहात असलेला गुंड अनिकेत उर्फ बंटी जाधव (रा. भुईंज, ता. वाई) याने कारागृहातून हाॅटेल व्यावसायिक राजेश नवघने (रा. मेणवली, ता. वाई) याला दहा लाखांची खंडणी मागितली होती. या गुन्ह्यात पोलिसांनी बंटी जाधवसह त्याच्या दोन साथीदारांना अटक केली होती. सोमवारी त्यांची पोलिस कोठडी संपल्याने त्यांना पुन्हा वाई न्यायालयात आणण्यात आले होते. त्यावेळी राजेश नवघने हा काळी पँट आणि पांढरा शर्ट परिधान करून हातात फाइल घेऊन वकिलाच्या पेहराव्यात न्यायालयात आला. फाइलमध्ये त्याने पिस्टल लपवून आणले होते. 

मात्र, न्यायालयामध्ये दिवाणी खटला सुरू असल्याने बंटी जाधव व त्याच्या सहकाऱ्यांना न्यायालयाच्या बाहेर व्हरांड्यात बाकड्यावर बसवण्यात आले होते. आजूबाजूने पोलिस उभे असल्याने त्याला गोळी झाडता येत नव्हती. त्यामुळे तो समोर असलेल्या बाकड्यावर चढला. इतक्यात पोलिसांची नजर त्याच्याकडे गेली.

क्षणाचाही विलंब न करता पोलिसांनी त्याचा हात पकडला. अशा अवस्थेतही राजेशने दोन गोळ्या झाडल्या. परंतु पोलिसांनी त्याचा हात खाली केल्यामुळे या दोन्ही गोळ्या बाकड्याजवळील भिंतीवर लागल्या. त्याच्या हातातून तातडीने पिस्तूल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले. सुदैवाने त्याने झाडलेल्या दोन गोळ्या कोणालाही लागल्या नाहीत. या घटनेमुळे न्यायालयात प्रचंड घबराट पसरली.

घटनास्थळी फिंगरप्रिंट तज्ज्ञ..

या घटनेनंतर घटनास्थळी फिंगरप्रिंट एक्स्पर्ट बोलवण्यात आले. तर बंटी जाधव व त्याच्या सहकाऱ्याची खबरदारी म्हणून घटनास्थळी डॉक्टर बोलावून वैद्यकीय तपासणी करण्यात आली. न्यायालयातच हा प्रकार घडल्याने जिल्हा मुख्य न्यायाधीश एस. एस. आडकर यांनी भेट देऊन माहिती घेतली. वाई न्यायालयात बंदोबस्त वाढविण्याची आवश्यकता असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. घटनास्थळी पोलिस अधीक्षक समीर शेख यांनीही भेट दिली.

Web Title: Gangster Bunty Jadhav came in the guise of a lawyer and fired at the court, disaster was averted due to police vigilance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.