सातारा: उपळवे येथे सव्वा पाच लाखांची गांजाची झाडे जप्त, पिता-पुत्रावर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2022 01:48 PM2022-10-13T13:48:48+5:302022-10-13T13:49:08+5:30
फलटण ग्रामीण पोलिसांनी छापा टाकून ही कारवाई केली.
फलटण : उपळवे (ता. फलटण) गावच्या हद्दीमध्ये तरडफ रस्त्यावरील माळ नावाच्या शिवारात ५ लाख २५ हजार रुपये किमतीची सुमारे १३ किलो गांजाची झाडे जप्त करण्यात आली. याप्रकरणी पिता-पुत्रावर गुन्हा दाखल करण्यात आला. हिंदुराव दादू लंबाते (वय ६०) व सागर हिंदूराव लंबाते (२५) अशी गुन्हा दाखल झालेल्या दोघांची नावे आहेत. फलटण ग्रामीण पोलिसांनी छापा टाकून ही कारवाई केली.
उपळवे गावातील तरडफ रस्त्यालगत माळ नावाच्या शिवारात हिंदुराव दादू लंबाते यांच्या मालकीच्या गट नंबर ८४६ मध्ये गांजाची झाडे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यामाहितीवरुन पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकला असता तीन ते आठ फूट उंचीची १३ किलो वजनाची गांजाची झाडे आढळून आली.
याप्रकरणी पोलिसांनी हिंदुराव लंबाते व सागर लंबाते या दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक सागर अरगडे यांनी फिर्याद दिली. या कारवाईमध्ये पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे, पोलीस नाईक काशीद, जगदाळे, पोलीस कॉन्स्टेबल कुंभार, जगदाळे, नायक तहसीलदार एस. एस. सावंत, कृषी पर्यवेक्षक दत्तात्रय राऊत यांचा सहभाग होता. गुन्ह्याचा पुढील अधिक तपास महिला पोलीस उपनिरीक्षक एस. ए. धोंगडे करीत आहेत.