Ganpati Festival -झेंडू दराने शंभरी ओलांडल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2020 06:29 PM2020-08-22T18:29:59+5:302020-08-22T18:33:43+5:30
सध्या कोरोनामुळे शेतकऱ्यांना बाजारपेठेतील अंदाज येईना, त्यामुळे जास्त खर्चाच्या पिकांकडे कानाडोळा सुरू आहे. औंध परिसरात लॉकडाऊनमुळे बाजारपेठ बंद राहत असल्याने धसका घेतलेल्या शेतकºयांनी झेंडू लागवडीसाठी उदासिनता दाखवली आहे. मात्र, उत्पादन कमी असल्याने बाजारपेठेत मात्र झेंडू फुलला असून, दराने शंभरी ओलांडली आहे.
रशिद शेख
औंध : सध्या कोरोनामुळे शेतकऱ्यांना बाजारपेठेतील अंदाज येईना, त्यामुळे जास्त खर्चाच्या पिकांकडे कानाडोळा सुरू आहे. औंध परिसरात लॉकडाऊनमुळे बाजारपेठ बंद राहत असल्याने धसका घेतलेल्या शेतकऱ्यांनी झेंडू लागवडीसाठी उदासिनता दाखवली आहे. मात्र, उत्पादन कमी असल्याने बाजारपेठेत मात्र झेंडू फुलला असून, दराने शंभरी ओलांडली आहे.
फुलांची बाजारपेठ ही मुंबई, पुण्यात आहे. मधल्या काळात लॉकडाऊनमुळे अनेक शेतकऱ्यांना आपला माल बाजारपेठेत पाठवता येत नसल्याने आर्थिक नुकसान सोसावे लागले होते.
सध्या तरी डोक्यावरील कोरोनाचे संकट दूर झाले नसल्याने काही शेतकऱ्यांनी नेहमीप्रमाणे झेंडूची लागवड केली नाही. तरीदेखील काही शेतकऱ्यांनी धोका पत्करून धाडसाने लागवड केली आहे. मात्र, धोका घेतलेल्या शेतकऱ्यांना सध्या तरी चांगले दिवस आले आहेत.
मुंबईतील दादरच्या फूल मार्केटमध्ये झेंडूने दराच्या बाबतीत शंभरी ओलांडली आहे. दर वाढला असला तरी आवक मात्र कमी आहे. श्रावण महिना, गणपती उत्सव, दसरा आणि दिवाळीच्या सणाला झेंडूच्या फुलाला चांगली मागणी असते; परंतु बाजारपेठेतील आवक वाढली तर शेतकऱ्यांना कवडीमोल किमतीने माल विकावा लागतो. नैसर्गिक आपत्तीमुळे खर्चाचा ताळमेळ बसत नाही. झेंडू हे दोन महिन्यांत सुरू होणारे पीक आहे.
खटाव तालुक्यात देखील यंदा अगदीच बोटावर मोजता येतील एवढ्याच शेतकऱ्यांनी झेंडूची लागवड केली आहे. लागवड कमी असल्याने बाजारात सध्या आवक कमी आहे. त्यातच मंदिरे बंद असल्याने फुलाला मागणी कमी होईल, असा अंदाज बांधून शेतकऱ्यांनी झेंडूची लागवड केली नाही.
पिवळ्या रंगाला जास्त मागणी
सध्या शेतकऱ्यांनी श्रावणी, गोल्ड स्पॉट-२, अष्टगंधा, कलकत्ता, टॉलयलो, नामधारी, टॉलआॅरेंज आदी जातीच्या केशरी आणि पिवळ्या झेंडूची लागवड केली आहे. बाजारपेठेत सध्या पिवळ्या रंगाच्या झेंडूला जास्त मागणी असून, दर १२० रुपये किलोपर्यंत पोहोचला आहे. नर्सरी मालकाने रोपे तयार केली असली तरी यंदा शेतकऱ्यांनी लागवडीसाठी दाखवली. उदासिनतेमुळे रोपांची विक्री झालेली नाही. एका एकरात अंदाजे सात हजार रोपांची लागवड केली जाते.
आवक कमी असल्याने दरवर्षी पेक्षा यंदा दर चांगला आहे. पाऊस, आणि कोरोनाची आपत्ती यामुळे लागवड कमी आहे त्यामुळे दसरा दिवाळीत देखील झेंडूचा दर चांगला राहिल. शिवाय धार्मिक स्थळे खुली झाली तर दर आणखीन सुध्दा वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
-रणजित येवले,
झेंडू उत्पादक शेतकरी,
वडी, ता. खटाव