गणपती मंडप आता चक्क नटबोल्टावर

By admin | Published: September 1, 2016 12:55 AM2016-09-01T00:55:28+5:302016-09-01T00:56:34+5:30

भारतमाता मंडळाचा उपक्रम : वर्षाकाठी लाखो रुपयांची बचत, रस्त्यांची होणारी दुर्दशा थांबणार

Ganpati Pavilion is now on a nutsbuilder | गणपती मंडप आता चक्क नटबोल्टावर

गणपती मंडप आता चक्क नटबोल्टावर

Next

सातारा : सदर बझार येथील भारतमाता मंडळाने पहिल्यांदाच खड्डेविरहित मंडप घालण्याचा निर्णय घेतला असून, अवघ्या आठवड्याभरातच स्केअर पाईपने सांगाडा तयार करून नटबोल्टच्या साह्याने मंडप उभारला आहे. यामुळे मंडपासाठी होणारा खर्च आणि रस्त्यावर खड्डेही होणार नसल्याने मंडळाने दुहेरी उद्देश साध्य केला आहे.
मंडळातर्फे गणेशोत्सव व दुर्गोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. यासाठी वर्षाला १ लाखापर्यंत मंडळाला खर्च करावा लागतो. हा खर्च वाचविण्यासाठी कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन लोखंडी मंडपाची संकल्पना मांडली आणि सात दिवसांतच ही कल्पना प्रत्यक्ष उतरवली.
दरवर्षी उत्सव काळात मंडप उभारण्यासाठी २० ते २२ खड्डे खोदले जात होते. तर मंडप बांधण्यासाठी १५ दिवसांचा अवधी लागत होता. परंतु आता तयार करण्यात आलेला मंडप अवघा १ ते २ दिवसांतच नटबोल्टद्वारे मंडप पूर्ण केला जात आहे.
दरम्यान, या मंडपाची उंची साधारण २२ फुटांची करण्यात आली आहे. ३० बाय २५ चौरस मीटर सांगाडा रुंदी आहे. उंचीसाठी वापरण्यात आलेला सांगाडा दोन टप्प्यांत बनविण्यात आला असल्याने १६ आणि २२ फूट उंचीचा मंडप उभारण्यात येणार आहे.
या मंडपामुळे रस्त्यावर खड्डे होणार नसल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

कार्यकर्ते बनले फिटर..
लोखंडी सांगाड्याने बनविण्यात आलेले हे मंडप अगदी कोणीही उभारू शकतात. केवळ एकाच दिवसात नटबोल्टने हे मंडप उभारणे शक्य आहे. तसेच हे मंडप खोलणेही तेवढेच शक्य आहे. त्यामुळे सध्या हे मंडप उभारण्यासाठी मंडळाचे कार्यकर्ते पाना-पक्कड घेऊन नटबोल्ट आवळण्यासाठी फिटरचे काम करत आहेत. एकही खड्डा न खोदता हे मंडप २३ फूट उंचीपर्यंत कार्यकर्ते बांधू लागले असून, या उपक्रमाने मंडळाचे कौतुक होत आहे.
शिक्षणासाठी खर्च करणार...
भारतमाता मंडळातर्फे दरवर्षी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी गणपती व दुर्गा उत्सवात विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक व शारीरिक स्पर्धा घेतल्या जातात. यातून बक्षीसपात्र विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात बक्षिसेही दिली जातात. आता मंडपामुळे मंडळाच्या वाचणाऱ्या पैशातून आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षणाचे साहित्य देण्याचा मानस असल्याचे यावेळी मंडळाच्या सभासदांनी ‘लोकमत’ला सांगितले.

लाखो रुपयांची बचत...
गणेशोत्सव आणि दुर्गोत्सवासाठी दरवर्षी लाखो रुपये मंडपाला भाडे द्यावे लागत होते. परंतु आता लोखंडी नटबोल्टचा मंडप तयार केला असून, याला जवळपास २ लाख रुपये खर्च झाला असला तरी हा मंडप कायमस्वरूपी वापरता येणार असल्याने दरवर्षी मंडळाची लाखो रुपयांची बचत होणार आहे.
- सतीश कांबळे, अध्यक्ष, भारतमाता मंडळ

Web Title: Ganpati Pavilion is now on a nutsbuilder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.