वडूज उपकेंद्र आहे की खिंडार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2021 04:35 AM2021-04-03T04:35:54+5:302021-04-03T04:35:54+5:30
वडूज : खटाव तालुक्याची राजधानी असलेल्या वडूज शहरातील मुख्य व भरवस्तीतील मजबूत इमारत असलेल्या आरोग्य उपकेंद्राची दुरवस्था झाली आहे; ...
वडूज : खटाव तालुक्याची राजधानी असलेल्या वडूज शहरातील मुख्य व भरवस्तीतील मजबूत इमारत असलेल्या आरोग्य उपकेंद्राची दुरवस्था झाली आहे; तर संबंधित विभागाकडून जाणीवपूर्वक डोळेझाक होत असल्यामुळे या परिसराचे एकप्रकारे खिंडार झाले आहे, असेच दिसते.
नव्वदच्या दशकात या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र असल्याने वडूज पंचक्रोशीतील रुग्णांची उत्तम सोय होत होती. तसेच दररोज रुग्णांना तपासणी करून प्रसंगी उपचारही होत असत. मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या या रुग्णालयात शेकडो रुग्णांची दैनंदिन तपासणी होत असे, तर नामांकित वैद्यकीय अधिकारी ही याठिकाणी रुग्णसेवा करून सेवानिवृत्त झाले आहेत. आजही त्यांच्या तोंडून या इमारतीमधील जुन्या आठवणींना उजाळा दिला जात आहे. कालांतराने तालुक्याचे मुख्यालय वडूज शहर झाल्याने कऱ्हाड रस्त्यानजीक ग्रामीण रुग्णालय मंजूर झाले. या जुन्या इमारतीपासून सुमारे अडीच ते तीन किलोमीटर अंतरावर ग्रामीण रुग्णालयाची सर्व सोयींनीयुक्त भव्य इमारत उभारली गेली. त्यामुळे येथील प्राथमिक आरोग्य केंद्र डिस्कळ याठिकाणी स्थानापन्न झाले. या इमारतीमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र, कातरखटावअंतर्गत उपकेंद्र सुरू झाले. याठिकाणी गरोदर मातांची आरोग्य तपासणी करून औषधोपचारही केले जात. तसेच शून्य ते सहा वर्षांच्या बालकांचे सर्व ते लसीकरणही केले जात होते. या इमारतीमध्ये आरोग्य सेविका आणि परिचारिका कार्यरत असत. तसेच वडूज परिसरातील आशासेविका, अंगणवाडी सेविका यांचेही काहीकाळ वास्तव्य याच इमारतीत असायचे. जुनी, मात्र आजही मजबूत असलेली ही इमारत संबंधित विभागाच्या दुर्लक्षामुळे इतिहासजमा होत आहे. वडूजकरांच्या दृष्टीने ही बाब निश्चितच खेदजनक ठरत आहे.
सध्या कोरोना काळातील प्रतिबंधक उपाययोजना म्हणून लसीकरण मोहीम सुरू आहे. आरोग्य विभागाकडून नगरपंचायत स्तरावर दररोज दीडशे नागरिकांना लस देण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे.
वडूज नगरीची लोकसंख्या सुमारे पंचवीस ते तीस हजारांच्या आसपास पोहोचली आहे. सध्या वडूज ग्रामीण रुग्णालयात लसीकरण मोहीम सुरू आहे. परंतु शहरापासून हे अंतर लांब पल्ल्याचे ठरत आहे. त्यामुळे याच इमारतीचा परिसर स्वच्छ करून याच ठिकाणी लसीकरण सुरू करावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
कोट
नगरपंचायत व जिल्हा परिषद आरोग्य विभागाने या इमारतीचा सुयोग्य वापर करून रुग्णांना दिलासा देण्यासाठी प्रयत्नशील रहावे. तसेच कातरखटाव प्रा. आरोग्य केंद्रअंतर्गत वडूज उपकेंद्र इमारतीत सर्वचप्रकारचे लसीकरण सुरू ठेवावे. त्यामुळे कोरोना काळातील प्रतिबंधक लसीकरण मोहीम यशस्वी होऊन अनेक नागरिकांना दिलासा मिळेल.
परेश जाधव, माजी उपसरपंच, वडूज
कोट
सध्याची इमारत पाहता व परिसरातील अस्वच्छता लक्षात घेता, या इमारतीशेजारीच असणाऱ्या जिल्हा परिषद शाळेच्या दोन खोल्या आरोग्य विभागाने ताब्यात घेऊन याच ठिकाणी उपकेंद्राचे दैनंदिन कामकाज सुरू आहे. कोरोना काळातील प्रतिबंधक उपाययोजना म्हणून घेण्यात येणाऱ्या लसीकरण मोहिमेसाठी नगरपंचायत व आरोग्य विभागाकडून योग्य जागेची पाहणी सुरू आहे.
डॉ. युनूस शेख, तालुका वैद्यकीय अधिकारी, खटाव पंचायत समिती, वडूज